प्रत्येक व्यक्तीला काहीतरी खास आवड किंवा छंद असतो.तो त्याला जपासता येतोच असे
नाही. पण असा काहीतरी विरंगुळा असतो की ज्यात त्याचे मन रमते. एक प्रकारचा ‘कम्फर्ट
झोन’ असतो. वाचन, आवडत्या मालिका पाहणे, खेळणे…एक ना अनेक!
माझाही असाच एक ‘कम्फर्ट झोन’ आहे….जरासा हटके…! तो म्हणजे, माझी मांजरे!
मला अगदी लहानपणापासूनच प्राण्यांची, विशेषतः मांजरांची खूप आवड.
माझे आई वडिल दोघेही नोकरी करत होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत घरात मला एकटीला कसं
ठेवणार? मग माझी रवानगी आजीकडे दादरला व्हायची. पण तिथे माझ्या बरोबरीचे कुणीच
नव्हते. आजी घरकामात असायची. मावशी आणि मामा त्यांच्या व्यापात मग्न असायचे. मग
दिवसभर मी काय करायचं हा प्रश्नच होता. माझ्या आजीचं घर तळमजल्यावर होतं आणि मागे
मोठ्ठी वाडी होती. खूप झाडंदेखील होती. पण त्यामुळे घरात खूप उंदीर यायचे. या
उंदरांच्या उच्छादापासून सुटका मिळावी म्हणून मांजर पाळले होते. ह्या मांजरानी दोन
कामं अगदी चोख केली. एक म्हणजे उंदिर मारले आणि आपल्या गोड वागण्याने मला समस्त
मांजर प्रजातिच्या प्रेमात पाडले.
दुपारी जेवणं झाली की आजी जरा आडवी होत असे. मलाही ती झोपायला सांगत असे. पण मला
जराही झोप यायची नाही. मग इकडे तिकडे टिवल्याबावल्या कर, मासिकं-पुस्तकं वाच असं
काहितरी करत असे. एकदा आमच्या मांजरीने ४ पिल्लं दिली. मग मला दुपारी वेळ कसा
घालवायचा हे प्रश्न पडला नाही. त्या मनीचं आणि तिच्या पिल्लांचं निरीक्षण करण्यात
मस्त वेळ जाऊ लागला. पहिल्यांदा जेव्हा मनीच्या पिल्लांजवळ गेले तेव्हा ती जरा साशंक
नजरेने माझ्याकडे बघत होती. पण २-३ दिवसांत तिची खात्री पटली असावी की माझ्याकडून
पिल्लांना काही धोका संभवत नाहीये, तेव्हा तिने माझी कंपनी तिने स्वीकारली.![]()
ती छोटी छोटी पिल्लं बघून मला आधी जरा विचित्रंच वाटलं. इवलेइवलेसे ते जीव…अजून
त्यांचे डोळेदेखील उघडलेले नव्हते. पायही जरा वाकलेलेच होते. पोट अगदी जमिनीपर्यंत
आलं होतं, पण टेकत नव्हतं एवढंच! डोळे बंद असूनदेखील आई जवळ आलेली त्यांना बरोबर
कळायची. मग मात्र आईजवळ जाऊन दूध लुचायला मिळेपर्यंत नुसती गडबड उडायची त्यांची.
आणि आईसाहेबांची स्वच्छतामोहिम चालू व्हायची. सगळ्या पिल्लांना एकदा चाटून काढले की
सुस्कारा टाकायचा!
पिल्लं हळूहळू मोठी होवू लागली. इवलेइवलेसे ते जीव आता डोळे उघडून बघायला लागले.
पायांत अजून ताकद आली नव्हती. पोटं अंगाच्या मानाने जरा मोठीच होती. आपले छोटेसे
डोळे उघडून आजूबाजूचं मोठ्ठं जग त्यांत साठवायचा प्रयत्न करायची. जरा कुठे खुट्ट वाजलं की शेपटी फुलवून पळून जात होती. मला त्यांची शेपटी फार आवडायची.
या सर्व गोड मांजरांमुळे मला मांजरांचा फार लळा लागला.
आजीकडून माझ्या घरी जायला आता मी फारशी उत्सुक नसायचे. त्यात आई – बाबांजवळ हट्ट चालू केला, आपणही आपल्या घरी मांजर पाळूया.
आईने उत्तम कारणं सांगून मांजर प्रकरण निकालात काढलं. ती म्हणाली, आपलं घर तिसर्या मजल्यावर आहे, तेव्हा आपण घरात नसताना माऊला शी/शू करायला बाहेर जायची असेल तर ती कशी जाणार? माझ्याकडे या प्रश्नाला उत्तर नव्हते. त्यामुळे मला गप्प बसायला लागले आणि मांजरांची आवड आजीकडच्या कधीकधीच भेटणार्या मांजरांवर भागवावी लागली.
पण काही वर्षांनी माझी ही इच्छा पूर्ण होणार अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे आम्ही तळमजल्यावरच्या मोठ्या जागेत रहायला गेलो. तळमजल्यावर घर असेल तर आईने काढलेली शंका आपोआपच निरसली….! ज्या दिवशी आम्ही या नवीन घरात रहायला गेलो, त्याच्या दुसर्या दिवशी मी आजीकडे गेले. आजीकडच्या मांजरीने महिन्यापूर्वी पिल्ले घातली आहेत हे माहित होते. आजीला सांगितले की मी पिल्लू न्यायला आले आहे. आजी माझ्याकडे पहातच राहिली. असला आचरटपणा करायला मी काही लहान नव्हते..चांगली फर्स्ट इयर बी.कॉम. ला होते. आणि माझी आजी दादरला रहायची आणि मी सांताक्रुझला!
क्रमशः
अगं खरंच! त्या जन्मून काही दिवसच उलटलेल्य पिलांची पोटं इतकी कशी काय लोंबत असतात ना! आधी मला वाटायचं की बहुतेक आमच्या पिलांमध्येच हा प्रकार आहे पण आता तुझ्या लेखात वाचून जाणवतंय की समस्त मार्जारकुळाची ही खासियत असावी!
लेख खासच जमलाय. आता उरलेले कधी वाचतेय असे झालेय.:)
By: VJ on जुलै 31, 2007
at 2:35 pm