ही मुलगी मांजराचे पिल्लू न्यायला आली आहे, तर दादरहून सांताक्रुझला नेणार कसे? आणि मुख्य म्हणजे घरी आईला विचारलय का? हे तिचे मला प्रश्न…! मी सांगितलं, “आईला विचारत बसले तर कधीही मांजर घरात येणार नाही. तेव्हा डायरेक्ट माऊ घरी घेउनच जाणार आहे. आणि पिल्लू घरी कसं न्यायचं हा काय प्रश्न झाला? एक कापडाची पिशवी दे. त्यात घालून बी.ई.एस.टी.च्या बसने घेऊन जाईन.” माझ्या चेहर्यावरचा निर्धार पाहून आजी काही बोलली नाही.
मग मी आमच्या मनुताईंकडे गेले…३ पिल्ले होती…यातलं कुठलं बरं न्यावं असा विचार करत होते. तिन्ही पिल्लं गोंडस होती.त्यातल्या एका पिल्लाचे कान अगदी छान होते…मोठ्या मोठ्या डोळ्यांनी ते माझ्याकडे पाहत होत. मला ते फार आवडले. तेव्हढ्यात आजी पिशवी घेऊन आली. पिशवी बघितल्यावर मनुताईंना वाटले त्यात तिच्यासाठी काही खाऊ आहे. आली लगेच ‘म्याव म्याव’ करत. आता तिच्यासमोर तिचे पिल्लू उचलून न्यायचे हे मला काही पटेना. मग आजीने तिला स्वैपाकघरात नेऊन दूध दिले. ती आत गेलेली पाहताच मी झटकन ते आवडलेले पिल्लू उचलले, पिशवीत टाकले आणि चपला पायात अडकवून बाहेर पडले.
![]()
पिशवीचे तोंड अलगद बंद केले होते. पिल्लू आतून ओरडत होतं. बसस्टॉप आजीच्या घरासमोरच होता. नशीबाने बसस्टॉपवर पोचल्या पोचल्या २०१ नंबरची बस आली. दुपारची ३ ची वेळ असल्याने बस अगदी रिकामी होती. बसायला जागा मिळाली. पिशवी मांडीवर ठेवून तिचे तोंड जरा मोकळे केले. पिल्ल्याला श्वास घेता यावा म्हणून. तर आतून साहेब बाहेर यायची धडपड करू लागले. मला जाम टेन्शन आलं. शेजारचा माणूस पिशवीकडे संशयाने बघू लागला. एक दोन स्टॉपनंतर त्याचा स्टॉप आला म्हणून उतरून गेला. आता मला खिडकी मिळाली. तेव्हढ्यात कंडक्टरकाका आले. आता मोठी परीक्षा होती. त्यांना जर काही संशय आला असता तर त्यांनी खाली उतरवले असते. पण एव्हाना ते पिल्लू माझ्या मांडीवर (अर्थात पिशवीत) छान सेटल झालं होतं. मी छोटीशी फट ठेवली होती…त्यातून त्याला हवा मिळत होती.
मी माझं तिकीट काढलं. (पिल्लाचं तिकीट काढायची गरज नव्हती…३ वर्षाखालील मुलांना तिकीत लागत नाही!!!) एकदाचा माझा स्टॉप आला. माझं घर स्टॉपपासून जरा लांब होतं. भराभर चालत घरी पोहोचले आणि आधी पिल्लाला पिशवीतून बाहेर काढले. ते तर बिचारं इतकं घाबरून गेलं होतं की त्याला बाहेर काढल्या काढल्या कपाटाच्या खाली जाऊन दडून बसलं. पार भेदरून गेलं होतं बिचारं. त्याला हाका मारून बाहेर बोलवत होते तर ते अजून घाबरून मागे मागे जात होतं. त्यावेळी त्याचा खूप राग आला, म्हटलं एवढ्या प्रेमाने त्याला बोलावते आहे, ते याला समजत कसं नाही?
मग विचार केला जरा राहू दे त्याला एकटंच…! त्याला तसंच ठेऊन मी आतल्या खोलीत माझं आवरायला गेले. ५-१० मिनीटांनी बाहेर आले, तेव्हा बघितलं की हे साहेब पण कपाटाच्या खालून थोडंसं डोकं बाहेर काढून आपण कुठे आलो आहोत हे बघत होतं. त्याच्या डोळ्यातलं भय आणि असहाय्यता बघून मला इतकं वाईट वाटलं…की त्या एवढ्याशा जीवावर काय वेळ आणली मी..! छानपैकी आपल्या आईच्या कुशीत पडून दूध प्यायचं आणि भावंडांशी मस्ती करायची एवढंच त्याला माहिती. त्याऐवजी, माझ्या वेड्या हट्टापायी, एक भयाण प्रवास करून आपल्या आईशिवाय या अनोळखी ठिकाणी तो इवलासा जीव भीतीने थरथरत होता. मला खूप पश्चात्ताप व्हायला लागला. वाटलं खूप लहान आहे हे पिल्लू त्याच्या आईशिवाय रहायला. पण मीही ठरवलं की आपण त्याची एखाद्या लहान
बाळासारखी काळजी घ्यायची. अगदी त्याच्या आईच्या भूमिकेत शिरायचं. आईच्या भूमिकेत शिरल्यावर पहिली गोष्ट जाणवली की याला भूक तर लागली नसेल? एव्हाना माझी चाहूल लागल्याने ते पुन्हा कपाटाखाली गेलं होतं. मग स्वैपाकघरात जाऊन एका छोट्या ताटलीत दूध आणलं. ते कपाटाच्या समोर ठेवलं आणि मी मुद्दाम आत गेले.
Hey…chaan challay….vachayala maja yetey….hope ajun pudhe lihinares tya pilla baddal….thanks for sharing
By: Koham on जून 8, 2007
at 2:45 सकाळी
pudhe yenaar aahe….pan mazhaa marathi typing chaa speed khup slow aahe…tyamule vel laagatoy
Thank you for your comment
By: अंतर्नाद on जून 12, 2007
at 4:34 सकाळी