रविवार सकाळ…२

रविवारची सकाळ नेहमीच आठवड्या़भराची शिदोरी देत होती. आठवडाभर सिमेंटच्या जंगलात राहून रहाटगाडग्यात अडकलेल्या मनाला जणू oxygen मिळत होता. हे सगळं कसं छान चाललं होतं.  

 

पण अचानक सगळंच बदललं…. 

ह्यां च्याबरोबर कुवेतला जायचं ठरलं…लेकाला ठाण्यात ठेऊन…! 

अनेक दगडधोंडे ऊरावर ठेऊन इथे आले….आणि रविवार सकाळ ला ध्यानीमनी नसताना कायमची मुकले. 

अहो, इथे आठवड्याची सुट्टी शुक्रवारी असते की हो! 

माझा फार म्हणजे फारच विरस झाला. शुक्रवारी सुट्टी असते हे ठिक आहे पण रविवारी ऑफिसला जायचे? हे जरा अवघडच होते. त्यात मला बॅंकेत नोकरी मिळाली. इथे बॅंका शुक्रवार, शनिवार बंद असतात. म्हणजे रविवारआठवड्याचा पहिला दिवस! अरे देवा…म्हणजे भारतातले सगळेजण हक्काचा रविवार उपभोगत असताना मी खांद्याला पर्स अडकवून ऑफिसला जायचं?  

माझ्या मनाला काही पटेना. उद्या ऑफिसला जायचे या विचाराने शनिवार रात्र फार त्रासदायक व्हायला लागली. त्यातून आई व लेकाचे हमखास रविवारी ऑफिसला खुशालीचे फोन यायचे. लेक रविवारचा आराम चालला असल्याचे निरागसणे सांगायचा. मी आपली मनातल्या मनात धुसफूसत ’काल परवा मस्त आराम केला मी’ अशी मलमपट्टी लावायचे, पण त्यात काही जोर नसे. 

आता इथे येऊन वर्ष झालं. अजून मी शुक्रवार,शनिवारला रविवार समजायची सवय करतेय. 

इथे अतिशय सुंदर समुद्र आहे. इथल्या एकंदर जीवनासारखाच शांत, निवांत. त्याच्याशी गट्टी केली आहे. जाते त्याला भेटायला…इकडच्या रविवारी..म्हणजे शुक्रवारी.