Comfort zone – 4

चिक्याच्या सगळ्याच गोष्टी लोभस होत्या. चालणे, खेळणे, दूध पिणे, आपल्या अंगाची साफसफाई करणे सगळ्या सगळ्या गोष्टी मला फार आवडायच्या. झोपल्यावर तर इतकं निरागस दिसायचं ना! 1037131.jpg

त्याला असं झोपलेले बघितले की मी हटकून त्याच्या अंगावरुन हलकेच हात फिरवायची. तेव्हढ्यानेही चिक्याला जाग यायची. ते कष्टाने मान उचलून झोपाळलेल्या नजरेने माझ्याकडे बघायचं आणि एका मिनीटात पुन्हा गाढ झोपून जायचं.  त्याला असं झोपेतून उठवलेले  माझ्या आईला अजिबात आवडायचं नाही. ती नेहमी मला त्यावरून ओरडायची. ( याबद्दल माझा मुलगा तान्हा असताना त्याला असं उठवल्याबद्दलही मी आईचा ओरडा खाल्ला आहे!)

हळूहळू त्याच्या खाण्या-पिण्याच्या आवडी निवडी आमच्या लक्षात यायला लागल्या. साहेब अगदी ‘शाही’ थाटाचे होते. साजूक तूप नसेल तर भाताकडे ढुंकूनही बघयचं नाही. त्याला साजूक तुपाच्या डब्याची जागा माहित होती. जर तूप वाढलं नसेल तर मान ऊंच करून त्या डब्याकडे बघत रहायचं. मग आपण तूप वाढलं की भाताचा चट्टामट्टा व्हायचा. कालचं दूध प्यायला दिलं तर ताटलीकडे एक तुच्छतादर्शक कटाक्ष टाकून स्वैपाकघरातून सरळ निघून जायचं. आणि बाल्कनीच्या कठड्यावर बसून रहायचं. त्याचे कान स्वैपाकघराकडेच लागलेले असायचे. दुधाच्या पातेल्यावरचं झाकण काढताना एक विशिष्ट आवाज यायचा. तो आला की लगबगीने आत यायचं. मग आपण ताजं दूध ताटलीत ओतलं स्वारी खूष!

ते जसं जसं मोठं होऊ लागलं, तसं बाबांना वाटायला लागलं की त्याला मासे वगैरे द्यायला हवेत. पण आमच्या घरी आम्ही पूर्ण शाकाहारी. ते मासे-चिकन आम्हाला आणायला कसं जमणार? बाबा म्हणाले,आपण जाऊन बघूया fish market  मध्ये. मग मी आणि माझे  बाबा…गेलो पहिल्यांदाच फिश मार्केटला. दारातच आलेल्या फिशच्या वासाने आत जावं की जाऊ नये हा विचार करत असताना एका कोळिणीने आम्हाला पाहिले. आमचे नवखेपण तिने चटकन हेरले. आम्ही ‘खाणार्‍या’तले वाटत नाही हे तिला कळले असावे. तिने बाबांना ‘काय पाहिजे भाऊ?’ असे विचारल्यावर बाबांनी तिला सांगितले की आमच्या मांजराच्या पिल्लासाठी मासे हवे आहेत. तर कुठचे मासे घ्यावेत? मला वाटतं अशा प्रकारची विचित्र मागणी तिच्याकडे पहिल्यांदाच आली असावी. तिने शेजारच्या कोळणीला consult केले. दोघींच्यात काहीतरी चर्चा झाली. तोवर मी आणि बाबा मासळीबाजाराचा असह्य होणारा वास चिकलेटचा गोंडस चेहरा डोळ्यापुढे आणून सुसह्य करत होतो. त्या कोळणीने आमच्या हातात छोट्याछोट्या सुक्या माशांचे पुडके ठेवले. ती म्हणाली, हे त्याला खायला घालून बघा.  सुके मासे बघून बाबांना जरा बरे वाटले. ती कोळीणही अशी की पैसे घेईना. म्हणाली, तुमच्या मांजराने जर हे खाल्ले, तर पुढच्या वेळेपासून माझ्याकडूनच घ्या मासे. तेव्हा घेईन पैसे. ह्याला म्हणतात cusotmer service!

घरी आलो. मासे वगैरे घरात आणायला आईचा विरोध होता. तिचे म्हणणे आजीकडे इतकी मांजरं होती पण कुणी त्यांचे असले लाड केले नाहीत. पण सुकी मासळी बघून तिचा विरोध निवळेल असे आम्हाला वाटत होते. आम्ही घरात पाऊल टाकले आणि चिकलेटने आरडाओरडा करून घर डोक्यावर घेतले. त्याला माशांचा वास आला होता. ती माशांची पुडी पिशवीतून काढून उघडेपर्यंत त्याला धीर धरवत नव्हता. सारखा पंजा मधे मधे घालत होता. ‘म्याव म्याव’ ही मोठं मजेदार करत होता. कारण त्याच्या तोंडाला माशांच्या वासाने पाणी सुटत होतं. शेवटी एकदाची पुडी काढून त्याने मनसोक्त मासे खाल्ले. आणि आमचा जीव भांड्यात पडला!

त्यानंतर हे सुके मासे नियमितपणे आणले जाऊ लागले. गंमत म्हणजे, आधी मासे आणायला विरोध करणारी माझी आई चक्क fish market मध्ये जाऊन मासे आणायची.

या माशांच्या वासामुळे, जवळची इतर मांजरंदेखिल आमच्या घरी यायला लागली. म्हणजे माझे मित्र-मैत्रिणी जितक्या सहजतेने आमच्या घरी यायची तितक्याच हक्काने आमच्या घरातल्या चार पायाच्या या सदस्याचे मित्र-मैत्रिणी आमच्या घरी पुक्खा झोडायला यायला लागले.

meow05.jpg

मी यथावकाश सर्व मांजरांचे नामकरण करून टाकले.

क्रमशः