अकेले है… तो क्या गम है…

मे महिन्यातली टळटळीत दुपार. ऑफिसमध्ये मीटिंग चालू होती. ए.सी. चालू असूनही शाब्दिक चकमकीमुळे मीटिन्गरूम चांगलीच तापली होती. अचानक बॉसने सुचवले की जरा चहा/ कॉफीचा ब्रेक घेऊया. या सूचनेमुळे सगळे जरा सैलावले आणि चहा/ कॉफी घेण्यासाठी बाहेर गेले. मी चहा/ कॉफी घेत नसल्याने आतच थांबले. जरा खिडकीपाशी आले. बाहेरचे रणरणते ऊन डोळे दिपवत होते. पूर्ण रस्ता निर्मनुष्य होता. मला वाटतं बाहेर एक वार्‍याची झुळूक आली असावी. कारण खिडकीच्या समोरचा पिंपळ मस्त सळसळला. इतक्या दिवसांत हा पिंपळ कधी नोटिस केला नव्हता. पण आज बाहेरच्या निर्मनुष्य स्तब्धतेत त्याच्या पानांच्या सळसळीमुळे त्याच्याकडे लक्ष वेधले गेले.

तो पिंपळ काही खूप मोठा वृक्ष नव्हता. पण अगदीच रोपटेही नही. माणसांच्या परिमाणात सांगायचे झाले तर, नुकतेच मिसरूड फुटलेला मुलगा असतो ना पौंगडावस्थेतला, अगदी तसाच मला तो भासला.

अंगावर तीन छ्टातली पाने मिरवत होता. काही गर्द हिरवी, काही पोपटी तर काही नाजूक कोवळी गुलाबी.पुन्हा एक झुळूक आली…आधीच्यापेक्षा जरा जोरदार. आधीपेक्षा अजून जोरात पानांची सळ्सळ झाली. असं वाटलं जणू अंग घुसळून मुक्त हसत होता…आनंदाने! इतक्या रणरणत्या उन्हातही किती खूष दिसत होता. जणू चांदण्याचा शीतल शिडकावाच होत होता त्याच्या अंगावर.

आजूबाजूला एकही झाड नाही. पूर्ण डांबरी रस्त्यावर हा एकटाच! तरीही आपला आनंद आपणच शोधतोय. आपणच आपला सोबती. काही दुखलं, खुपलं तरी स्वत:च स्वत:चा सवंगडी. जणू पाडगावकरांची कविताच जगत होता…

आपलं गाणं आपल्याला गाता आलं पाहिजे…

आणि एकटं एकटं पुढे जाता आलं पाहिजे…

मग त्या ऑफिसमध्ये मी असेपर्यंत एक बंध निर्माण झाला त्याच्यामाझ्यात. त्याच्याकडे बघून ऒळखीचे स्मित चेहर्‍यावर यायला लागले.

काही महिन्यांनी माझं ऑफिस दुसरीकडे गेलं…शहराच्या दुसर्‍या टोकाला. त्याची माझी प्रत्यक्ष भेट नाही झाली तरी तो एकाच वेळी दोन ठिकाणी अस्तित्वात आहे. एक त्याच्या जागेवर आणि दुसरा माझ्या मनात….!