शांततेचा आवाज

जंगल भटकंतीच्या निमित्ताने अनेकदा जंगलात, शहरापासून दूर जाणं होतं . या भटकंतीमध्ये सर्वात जास्त काय अपील होतं, तर तिथली शांतता! जंगलातल्या एखाद्या तळ्याच्या काठी जर आपण बसलो, तर तिथे खूप छान शांतता अनुभवायला मिळते. आपण एखादी सावलीची जागा धरून बसायचं . समोर छानसं तळे आणि त्याच्या आजूबाजूला गर्द झाडी ! सगळीकडे एक सुंदर स्तब्धता !आपण तिथे नुसतं बसून तिथली शांतता अनुभवत,आजूबाजूच्या परिसराचं निरीक्षण करत राहायचं! जसे जसे आपण शांत बसून रहातो, तसं तसं आपल्याला जाणवायला लागतं, की जरी सभोवती शांतता असली, तरी निश्चलता नाहीये. मध्येच वाऱ्याची एखादी झुळूक येते आणि पाण्यावर तरंग उमटवून जाते. पाण्यातला एखादा खोडकर मासा हळूच पृष्ठभागावर डोकावतो, आणि पाण्यात वलयं तयार करतो. काठावरच्या रानफुलांवर विविध फुलपाखरं भिरभिरतायत. एखाद- दुसरा छोटासा पक्षी घाईघाईने एका झाडावरून उडून दुसऱ्या झाडाच्या पानांमध्ये लुप्त होतोय. मध्येच एखाद्या झाडाची दोन चार चुकार पाने निःशब्दपणे धारातीर्थी पडताहेत. एखाद्या पक्ष्याचा वा प्राण्याचा आवाज जरी ऐकू आला, तरी तो त्या शांततेचा भंग करत नाही, तिला एक वेगळी खोली देऊन जातो. मग इथली शांतता हलकेच आपलया कानात कुजबुजते – तू सुद्धा आतून असाच हो – शांत आणि निर्मल! जंगलातून घरी गेलं, तरी या शांततेचा आवाज खूप दिवस ऐकू येत राहतो, शहराच्या गोंगाटात पूर्ण दाबून जाईपर्यंत. मग पुन्हा ओढ लागते, परत जंगलात जायची!

सध्या लॉक डाऊन मुळे शाळा, कॉलेजेस , ऑफिस सर्व बंद आहे आणि रस्त्यांवरची वर्दळ, वाहने अगदी मोजकी आहे. त्यामुळे आता आपल्याला थोडे दिवस तरी शहरातच या अत्यंत दुर्मिळ अशा शांततेचा अनुभव घेता येतो आहे ! पण त्या तळ्याकाठी अनुभवलेल्या शांततेचा निर्मळपणा या शांततेत जाणवत नाही. या शांततेचा आवाजही कुजबुजता – पण दहशत निर्माण करणारा…..अस्वस्थ करून टाकणारा. प्रत्येकाच्या मनात एकाच शंका – ही वादळापूर्वीची शांतता तर ठरणार नाही ना? आज प्रत्येकाच्या डोळ्यात उद्याच्या अनिश्चिततेचं प्रश्नचिन्ह आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या हजारो लोकांचे आज रिकामे हात, रिते खिसे, भकास डोळे आणि उजाड मने ! एका विषाणूच्या स्फोटाने त्यांच्या छोट्या छोट्या स्वप्नांच्या उडालेल्या चिंधड्या या शांततेचा आवाज अजून भयाण करत आहे.

हे विधात्या, अतिगर्विष्ठ आणि उन्मत्त झालेल्या या मनुष्य प्राण्याला स्वतःच्या आत डोकावून बघून अंतरात्म्याचा क्षीण झालेला आवाज ऐकण्यासाठी तर ही शांतता प्रस्थापित केली नाहीसा ना ?