पक्षाने आत्महत्येच्या चिठ्ठीत कुणाचे नाव लिहायचे ?

या लॉक डाऊन च्या काळात, महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाच्या टीमने एकापेक्षा एक उत्तम वेबिनार्सचे आयोज़न केले. आत्तापर्यंत २३ वेबिनार्स झाले आणि अजून काही नजीकच्या काळात होतील. 

दिनांक १ जून २०२० रोजी, महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनातर्फे, सकाळी ११ वाजता ‘शेताच्या बांधावरील झाडे – संरक्षण आणि संवर्धन’ या विषयावर उत्तम वेबिनार झाला. माननीय  श्री. अभिमन्यू काळे (IAS) हे आजचे वक्ते होते. 

या वेबिनार मध्ये, श्री. काळे सरांनी शेताच्या बांधावरच्या झाडांचे आसपासच्या परिसंस्थेतील स्थान आणि महत्त्व समजावून सांगितले. या झाडांचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, बरेचदा  शेतजमिनीच्या आजूबाजूच्या जंगलातील आढळणारी  झाडेच शेतबांधांवर असतात. त्यामुळे ही झाडे, त्या परिसरात आढळणाऱ्या कीटक, प्राणी, पक्षी यांना अन्न पुरवतात,  घरटी करण्यासाठी आणि रातथाऱ्या साठी जागा देतात. त्याचप्रमाणे, झाडांच्या मूळांमुळे मृदासंधारण, जलसंधारण होते. एकूण काय, तर एकेक वृक्ष अनेकविध पद्धतीने पर्यावरणांत आपले स्थान तयार करत असतो. बरेचदा, शेतजमिनी जंगलाच्या आसपास असतात. अशा वेळी, जेव्हा जंगलातले पक्षी जंगलाबाहेर येतात, तेव्हा ही स्थानिक झाडे त्याना आपली वाटतात आणि पक्षी/इतर प्राण्यांचे संवर्धन होते. 

बरेचदा शेतकरी ही  शेतातल्या बांधावरची झाडे, जळणासाठी कापतात किंवा पैशासाठी विकून टाकतात. झाडे विकून अगदी नगण्य मोबदला मिळतो. 

या झाडांचे महत्त्व समजल्याने , त्यांना कसे वाचवता येईल,यासाठी श्री. काळे सर गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना एक योजना राबवली. या योजने अंतर्गत, शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना या झाडांचे महत्त्व पटवून द्यायचे, त्यांच्या शेतात असलेल्या बांधावरच्या झाडांची नोंद करायची आणि शेतकऱ्याने ते झाड कापले नाही, तर ते झाड तिथे अस्तित्त्वात असेपर्यंत, प्रतिवर्षी शासनातर्फे काही ठराविक रक्कम  दिली जाईल. 

यामुळे शेतकऱ्याचा आर्थिक लाभ होईल आणि त्याबरोबर एका इकोसिस्टिम ला जीवदान मिळेल. शिवाय शेतकर्याना झाडाचे दुरोगामी फायदे लक्षात येतील. असे या योजनेचे ठोकळ स्वरूप होते. सदर योजना गोंदिया येथे यशस्वी झाल्यावर, महाराष्ट्र शासनाने, ही  योजना पूर्ण महाराष्ट्रात राबवायचा विचार केला. त्यासाठी एक समिती स्थापन केली, ज्यात काळे सरांबरोबर इतर अनेक मान्यवर सदस्य आहेत. 

या समितीने सादर केलेला आराखडा सरकारकडे मंजुरीसाठी आहे. हे लॉक डाऊनचे संकट जरा दूर झाले की आपण सारे पर्यावरण प्रेमी ही योजना मंजूर करून  घेण्यावर जोर देऊ शकतो.  
श्री. काळे सरांनी अतिशय प्रभावीपणे हा विषय सर्वांपुढे मांडला. वेबिनारची सांगता करताना, त्यांनी स्वतः केलेली एक मुक्तछंदातली कविता सादर केली. 

निसर्गाचा महत्त्व आणि त्याचे संरक्षण किती महत्त्वाचे आहे हे जाणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या काळजाला ही कविता आणि त्याचा भावार्थ भिडल्याशिवाय राहणार नाही. 


कवितेचे शीर्षक आहे: पक्षाने आत्महत्येच्या चिठ्ठीत कुणाचे नाव लिहायचे

शेजारच्या कौलारू घरातून

येणारा फोडणीचा खमंग दरवळ

आणि त्या शेजारील इमारतीतील

पिझ्झा पॉईंटच्या पिझ्झावरील चिझचा सुगंध 

यापैकी कोणताही वास 

त्या पाखराला भुरळ घालत नव्हता…

घरट्यात  झोपल्या झोपल्या त्याला आठवत होता.. 

तो काटेसावरीच्या फुलांमधील मध 

आणि शेजारील वटवृक्षावरील लालचुटुक फळे…..


मग सकाळी उठल्या उठल्या

त्यानं झेप घेतली घरट्यातून 

तेअगदी काटेसावरीपर्यंत.. 

पण तो पडतापडता अगदी थोडक्यात बचावला… 

काटेसावरीच्याही फार पुढे अगदी निलगिरीपर्यंत झेपावला…

त्यानं पाहिलं त्याची काटेसावर

आणि पिढ्या न् पिढ्यांच वडाचं झाड 

मग त्यानं निलगिरीच्या फुलांनाचचावून पाहिलं थोडंस,

पेल्टाफोरमची फुले चोच घालून तपासली, गुलमोहराचा आसरा घेतला

पण त्याचा काही उपयोग होईलअसं सुतराम वाटलं नाही…


मग तो तिथून उडाला आणि एका बाभळीच्या झाडावर गेला 

तिच्या शेंगा खाऊन शेजारची किंजळ गाठली त्यातले थोडेसे किडे काढून खाल्ले…

त्या दिवशी तो खूप नाराज झाला थकला, हिरमुसला…..

या मशीन चालवणाऱ्यांना कसे कळेल मला रोज भूक लागते…

मला घर बांधायला फांदी लागते…..माझ्या पिल्लांना किडे मुंग्या लागते…..

तो दिवस त्यानं कसाबसा काढला 

पण पुढचे दोन-तीन दिवसहीत्याला असे तसेच काढावे लागले…

बघता-बघता पंधरा दिवस झाले

या पंधरा दिवसात..त्या शेतामध्ये कॉलनीचा लेआउट सजला ! 

पांढऱ्या रेषा मारलेल्या प्लॉटमध्ये साड्या घालून,

नवे गाॅगल लावून हातामध्ये मंगल कलश घेऊन

गृहिणी पूजा करायला थटल्या…

पूजेच्या नैवेद्यावर आपलं पोट भरेल का ?

याचाही प्रयत्न त्याने करून पाहिला…

परंतु लक्षात आलं की आता आपल्याला…

आत्महत्या करण्याशिवाय पर्यायच नाही !

त्याची हताशा पाहून आजुबाजुच्या सप्तपर्णी, कॅशीया निलमोहोरांनी त्याला

त्यांची फुले,पाने,फळे,डिंक offer केली….

वड पिंपळ उंबर outdated झाले आहेत हे समजवण्याचा प्रयत्न केला…..

पण, त्यांचे आभार मानून शेवटी ईतरांनी निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे अटळ झालेला निर्णय स्विकारला….

आता आत्महत्या करावीच लागणार !
या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या माणसाचं नाव चिठ्ठीवर लिहायचं ठरवलं…
पाखरा पुढं प्रश्न एकच आहे…की जबाबदार म्हणून नाव नक्की कोणाचं लिहायचं ?
ज्यानं झाड कापलं…त्या जिन्सवाल्या शेतकऱ्याचं ?

की जेसीबीचं धुड रोरावतसगळं काही चिरडून टाकलं…त्या टोपीवाल्या चालकाचं ?

की त्या प्लॉटमध्ये,डीएस्एल्आर कॅमेरा घेऊन…

त्या पाखरांचा अगेन्स्ट द लाईट,सुंदर फोटो काढलेल्या माणसाचं ?

पाखरू थरथरतंय…..त्याचं मत निश्चित होत नाहीये…नक्की नाव कुणाचं लिहावं..?

तुम्ही त्याला थोडीफार मदत करू शकाल ?