आसाम- अरुणाचल प्रदेश – नागालॅन्ड भाग १

२००९ साली लडाखला गेले होते. लेहच्या हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये बसलेली असताना समोर पडलेले मासिक सहजच उचलले. उघडले…आणि नजरबंदी झाल्यासारखी त्यातल्या फोटोंकडे पहात राहिले. अरुणाचल प्रदेश मधल्या तवांगचे  अतिशय नयनरम्य फोटो होते. तिथे बसल्याबसल्याच ठरवून टाकले, इथे जायचेच! 

२०१० च्या वार्षिक सुट्टीत सन्दकफू या हिमालयातल्या एका शिखरावर पर्वतारोहणासाठी जायचे ठरवले होते. पण प्रकृतीच्या काही कुरबुरीमुळे ते रद्द करावे लागले!  मग लगेच आठवण झाली ती तवांगची! लगेच फोन लावला तो ईशा टूर्सच्या आत्माराम परबला! त्याच्याबरोबर Valley of Flowers, औली-बद्रिनाथ-केदारनाथ आणि श्रीनगर-लेह-कारगील-द्रास-मनाली अशा दोन अविस्मरणीय टूर्स केल्या होत्या. त्यामुळे विचार केला आधी त्याला विचारावे की तो काही ऑर्गनाईझ करू शकेल का? माझी इच्छाशक्ती फारच प्रबळ होती…कारण नेमक्या माझ्या सुट्टीच्या दिवसातच तो अरुणाचल-आसाम-नागालॅन्ड्-मेघालय अशी टूर काढतो आहे ही सुवार्ता कानी पडली. आत्मारामला माझी आणि चिन्मयची ( माझ्या लेकाची) सीट कन्फर्म करायला सांगितली आणि चिन्मयला ताबडतोब हे सुवर्तमान कळवले!

यथावकाश, प्रवासाच्या तारखा, ईटनरी, इतर सहप्रवाश्यांची नावे, सोबत आणावयच्या वस्तूंची यादी, मुम्बई-गोहत्ती विमानप्रावासाची टिकीटे हे ईशा टूर्सने ई मेलद्वारे पाठवले. ईशान्येकडच्या या सात राज्यांमधे जाण्यासाठी भारतीय नागरिकांनादेखील परवाना घ्यावा लागतो. (०१ जानेवारी २०११ पासून हा परवाना काढण्याची गरज नाही). ते ही काम पार पडले. आणि २ महिने ज्याचा धोशा लावला होता…त्या प्रवासाचा दिवस उजाडला!

गुवाहाटीला सकाळी ११.३० वाजता विमान पोहोचले. तिथून १८० कि.मी. वर असलेल्या नामेरी नॅशनल पार्क मध्ये पहिला मुक्काम होता. आमचा एकंदर २० जणांचा ग्रूप होत.  या पुढचा सर्व प्रवास क्वालीस गाड्यांतून होता. ४ जण एका गाडीत या हिशोबाने ५ क्वालीस एअरपोर्टच्या बाहेर आधीच आलेल्या होत्या. आमची ग्रूप लीडर होती नावाप्रमाणेच नेहमी चेहर्‍यावर स्मितहास्य असणारी स्मिता रेगे. सगळ्यांचे सामान गाड्यांत रचून झाल्यावर आम्ही कूच केले. शहरातले रस्ते अगदीच लहान…दुपदरी होते. त्यामुळे बाहेर पडेपर्यंत जरा वेळ लागला. शहरही तसं मागासलेलंच वाटत होतं. हळूहळू शहर मागे पडले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाताची शेते आणि चहाचे मळे दिसायला लागले. मधेच लहानलहान गावेही लागत होती. कुडाची मातीने सावरलेली घरे, आजूबाजूला सुपारी आणि केळीची झाडे बघून असे वाटायला की चुकून कोकणातल्या एखाद्या गावात तर आलो नाही ना!

हवेत सुखद गारवा होता. आमचा driver ज्याला सगळेजण ‘कोलीदा’ म्हणत होते तो अतिशय safe and matured driving  करत होता. आमच्या गाडीत चिन्मय आणि माझ्या व्यतिरिक्त श्री. वसंत गोंधळेकर आणि आशा दावडा हे दोन सहप्रवासी होते. त्यापैकी गोंधळेकर काकांना मी आधीपासून ओळखत होते. मागच्या वर्षीच्या लेहच्या trip मध्ये ते ही आमच्यासोबत होते. गोंधळेकर काका हे एक अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व. वय वर्षे ७६.  देवदयेने तब्बेत उत्तम. जगातले अर्धे देश आणि जवळजवळ सगळा भारत फिरून झालेला.  एवढंच नाही तर ३-४ वर्षांपूर्वी उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या दोन्ही ध्रुवांवर जाऊन आले होते. दोन्ही ध्रुवांवर जाऊन आलेली माझ्या माहितीतली ही पहिली व्यक्ती! फोटोग्राफीचा छंद गेली ४० वर्षे जोपासला होता.  आमच्या दुसर्‍या सहप्रवासी आशाताई या ही उत्तम फोटोग्राफर! निसर्गाची आणि वन्यजीवनाची खूप आवड असलेल्या!  माझी आणि चिन्मयची फोटोग्राफी शिकायची इच्छा पूर्ण होणार असं वाटायला लागलं! गोंधळेकर काकांकडे अतिशय उत्तम कॅमेरा आणि टेलिस्कोपिक लेन्सेस होत्या. आशाताई आणि चिन्मय या दोघांचे advanced SLR कॅमेरे होते. माझ्याकडे मात्र एक गरीब बिचारा Panasonic चा Digicam  होता. या तिघांच्या advanced cameras ने बुजून न जाता मीही धडाकेबाज फोटोग्राफी करायचे आणि शिकायचे ठरवले! अहो,  गोंधळेकरकाकां सारखे गुरू आणि सहप्रवासी मिळायलाही भाग्य लागतं!

 आमची गाडी मस्त चालली होती. बाहेर दुतर्फा चहाचे मळे दिसत होते. एवढ्यात काकांनी कोलीदाला गाडी थांबवायला सांगितली. आमच्या प्रश्नचिन्हांकित चेहर्‍याकडे बघून त्यांनी बाहेरच्या मळ्यांकडे बोट दाखवले. काकांनी एक महत्त्वाची टीप दिली. ते म्हणाले, हा सूर्यप्रकाश बघा कसा सोनेरी आहे. अशा सोनेरी प्रकाशात फोटो नेहमी चांगले येतात. बाहेर बघितले, तर खरंच, सुंदर सोनेरी सूर्यप्रकाशात चहाचे मळे  न्हाउन निघत होते. चाय बागानांचे फोटो घेऊन पुढे निघालो.

 

मधेच एका ठिकाणी चहापानाचा विश्राम घ्यायचे ठरले. ज्या हॉटेलच्या बाहेर गाड्या थांबल्या त्याचा एकंदर अवतार काही स्वागतार्ह नव्हता. कळकट भिंती, बसण्यासाठी बाकडी टाकलेली, लोक पितळेच्या परातीत भाताचे ढीग खात होते. इथे चहा प्यायचा? असा आमच्या चेहर्‍यावरचा प्रश्न पाहून, गल्ल्यावरचा माणूस लगबगीने पुढे झाला आणि त्याने आम्हाला हॉटेलच्या मागच्या बाजूस जाण्याचे विनंती केली.  आम्ही सर्वजण त्याने सांगितल्याप्रमाणे मागे गेलो. तिथले दृष्य पाहून थक्क झालो. मागे एक सुंदर तलाव होता. त्याच्या काठावर एक बांबूची लांबलचक झोपडी…गवताचे छप्पर असलेली. तलावाच्या मागे भाताचे शेत होते. आणि सगळीकडे एक सुखद नीरव शांतता. हे दृष्य पाहून आम्हा सगळ्यांचा प्रवासाचा शीण चहा घ्यायच्या आधीच नाहीसा झाला. तलावाचं पाणी इतकं सुस्पष्ट आणि नितळ होतं की आजूबाजूच्या झाडांची प्रतिबिंब आरशात पडल्याइतकी स्पष्ट होती.

 Photo Lake at NH 52

आमच्या टूर लीडर, स्मिताने आम्हाला चहा तयार असल्याचे सांगितले. त्या लांबलचक झोपडीमध्ये  सॅण्डविचेस आणि आसामचा ताजा चहा घेऊन साधारण अर्ध्या-पाऊण तासाने म्हणजे ४.३० वाजता बाहेर आलो. बाहेर संधिप्रकाश पसरला होता. Driver ने सांगितले की इथे संध्याकाळी ५ वाजता अंधार पडतो. नामेरी नॅशनल पार्क अजून ३ तासांवर होते. पुन्हा प्रवास सुरू. थोड्या वेळात पूर्ण अंधार झाला. रस्त्यावर आणि आजूबाजूला कुठेही दिवे नाहीत. रस्त्यावरच्या गाड्यांचा जेवढा असेल, तेवढाच उजेड! पूर्णतः अनोळखी परिसर आणि काळोख, यामुळे इतका वेळ रम्य वाटणारा प्रवास आता भयाण वाटायला लागला. थोड्या वेळाने आम्ही NH 52  सोडून नामेरी पार्कच्या रस्त्याला वळलो.  या रस्त्याला आजूबाजूला फक्त जंगल! रस्ताही कच्चा. आमचा driver  अनुभवी असल्याने आणि त्याला रस्त्याची आणि त्यावरील खडड्यांची पूर्ण माहिती असल्याने, आम्ही सगळे सुखरूप नामेरी पार्क मधील एको रिसॉर्टला संध्याकाळी ७.३० ला पोहोचलो!

 

या इको रिसॉर्ट मध्ये विटा आणि सिमेंटचा कमीतकमी वापर केला होता. बहुतेक सर्व रूम्स म्हणजे  self contained tents होते. मला आणि चिनूला मात्र बांबूने बनवलेली मस्त इक मजली झोपडी मिळाली होती. वर जाऊन बघितलं आणि तबियत खूष झाली. साधी, स्वच्छ खोली. बांबूच्या भिंती आणि त्याचेच चटईसारखे विणलेले छत. एव्हाना थंडी चांगलीच वाढली होती. बेडवर ठेवलेले उबदार quilts  जेवणाचा मोह सोडून सरळ झोपून जावे का…असा विचार करायला लावत होते. पण भूकही सपाटून लागली होती. त्यामुळे fresh  होऊन जेवायला गेलो. गरमागरम जेवणाचा आस्वाद घेऊन, सगळेजण गप्पा मारत बसलो. थंडीचा कडाका जरा वाढल्यावर रूम मध्ये आलो. क्विल्टमध्ये शिरलो. दिवा बंद केल्यावर कळले की छ्पराला असलेल्या विणीतून मस्त चंद्रप्रकाश येतो आहे.  त्या चंद्रप्रकाशाकडे बघता बघता कधी झोप लागली कळलंच नाही! सकाळी कुठल्याही alarm  शिवाय जाग आली. काल जेव्हा इथे आलो, तेव्हा अंधार होता,  त्यामुळे  दिवसा उजेडी हा परिसर कसा दिसतो हे बघायची उत्सुकता होती. खिडकीचा पडदा बाजूला सारून बघितले, तर सगळीकडे मस्त जंगल होते.

Photo Our Hut at Nameri Eco Reso

 आम्हाला breakfast च्या आधी तिथून १८ कि.मी. वर असणार्‍या ‘जिया भोरोली’ या नदीवर बोटिंगला जायचे होते. या नदीत राफ्टिंगही होते. पण  राफ्टिंगसाठी आवश्यक तेवढे पाणी नसल्याने, आम्ही बोटिंग करणार होतो. पटापट तयार होऊन गाडीतून नदीवर पोहोचलो. ही नदी नामेरी नॅशनल पार्कला दोन भागात विभागते. स्वच्छ, मोकळी ताजी हवा, उबदार सूर्यप्रकाश, दूर क्षितीजाजवळ दिसणार्‍या पर्वतरांगा आणि दोन्ही काठांवर वनराई मिरवणारी नागमोडी वळणांची ‘जिया भोरोली’ ! इतकं सुंदर दृष्य मनःपटलावर आणि कॅमेरावर साठवून घेत होतो.  कयाकमध्ये बसून प्रवास सुरू झाला.  पाण्यला चांगलीच ओढ होती, पण भीतीदायक नव्हती. आजूबाजूचे वनश्री न्याहाळत, भरपूर फोटो काढत १३ कि.मी. चा प्रवास कधी संपला ते कळलं नाही. 

Jia Bhoroli  

 

 

 

Photo Chinu & Jogalekar Kaka 

थंडी खूप होती. रिसॉर्टवर परतून गरमगरम पाण्याने अंघोळ करायची असा विचार करत असतानाच काही तांत्रिक कारणांमुळे गरम पाणी मिळणार नाहे हे शुभवर्तमान कळले. मोठ्या धैर्याने थंडगार पाण्याने आंघोळ केली. गरमागरम नाश्ता करून, सामान घेऊन पुढच्या प्रवासासाठी गाडीत येऊन बसलो. खरं तर नामेरीचा हा निसर्गरम्य परिसर आणि आमची चंद्रमौळी झोपडी इतक्यात सोडून जायचे अगदी जिवावर आले होते. पण काय करणार…अरुणाचल प्रदेश साद घालत होता.

क्रमशः

उत्तरायण

तुझ्या शब्दांतली आश्वासनं

मनाला खूप उभारी देऊन गेली

आता कितीही वादळं आली…तरी

तू माझाच आहेस हे सांगून गेली 

कुठल्या जन्मीचे हे ऋणानुबंध

कुठल्या पुण्याची ही फलश्रुती

तू आणि मी भेटलो, तयार झाली

आयुष्यभराची अतूट नाती 

हा स्नेह असाच रहावा…नाही नाही

उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा

आयुष्याच्या उत्तरायणात

माझा प्रवास तुझ्या साथीने व्हावा

असाही संवाद…!

तुझ्याशी बोलताना आज काही वेगळंच जाणवलं
अचानक शब्द सुचेनासे झाले, विचारही खुंटले
असं का व्हावं हा विचार करत असताना
अचानक लक्षात आलं की तुझी अवस्थाही
माझ्यासारखीच आहे…….
 
दोघांनाही शब्दांची गरजच राहिली नाही का
एकमेकांशी बोलायला?
 
फोनच्या दुसर्‍या टोकाला तू असावस आणि
एकही शब्द न बोलता माझ्या मनातले
गूज हलकेच समजून घ्यावेस…..
 
गाडीतून दिशाहीन भटकंती करताना
संवाद चालावा तुझ्या हाताचा माझ्या हाताशी…
 
कधीतरी असंही व्हावं…अचानक मिळालेल्या एकांतात
सुंदर काव्य गुंफलं जावं शब्दांशिवाय
उष्ण श्वासांचं, दाहक स्पर्शाचं, उसळणार्‍या आवेगाचं…
 
कधीतरी आजूबाजूच्या माणसांच्या गर्दीत
घुसमटत असताना अचानक तुझ्याशी
नजरानजर व्हावी आणि नजरेनेच द्यावं
शंभर शब्दांचं बळ!
 
तुझ्यामाझ्यात हा संवाद अनंत वेळा होतो….तुझ्यामाझ्या नकळत!

 

Comfort zone – 4

चिक्याच्या सगळ्याच गोष्टी लोभस होत्या. चालणे, खेळणे, दूध पिणे, आपल्या अंगाची साफसफाई करणे सगळ्या सगळ्या गोष्टी मला फार आवडायच्या. झोपल्यावर तर इतकं निरागस दिसायचं ना! 1037131.jpg

त्याला असं झोपलेले बघितले की मी हटकून त्याच्या अंगावरुन हलकेच हात फिरवायची. तेव्हढ्यानेही चिक्याला जाग यायची. ते कष्टाने मान उचलून झोपाळलेल्या नजरेने माझ्याकडे बघायचं आणि एका मिनीटात पुन्हा गाढ झोपून जायचं.  त्याला असं झोपेतून उठवलेले  माझ्या आईला अजिबात आवडायचं नाही. ती नेहमी मला त्यावरून ओरडायची. ( याबद्दल माझा मुलगा तान्हा असताना त्याला असं उठवल्याबद्दलही मी आईचा ओरडा खाल्ला आहे!)

हळूहळू त्याच्या खाण्या-पिण्याच्या आवडी निवडी आमच्या लक्षात यायला लागल्या. साहेब अगदी ‘शाही’ थाटाचे होते. साजूक तूप नसेल तर भाताकडे ढुंकूनही बघयचं नाही. त्याला साजूक तुपाच्या डब्याची जागा माहित होती. जर तूप वाढलं नसेल तर मान ऊंच करून त्या डब्याकडे बघत रहायचं. मग आपण तूप वाढलं की भाताचा चट्टामट्टा व्हायचा. कालचं दूध प्यायला दिलं तर ताटलीकडे एक तुच्छतादर्शक कटाक्ष टाकून स्वैपाकघरातून सरळ निघून जायचं. आणि बाल्कनीच्या कठड्यावर बसून रहायचं. त्याचे कान स्वैपाकघराकडेच लागलेले असायचे. दुधाच्या पातेल्यावरचं झाकण काढताना एक विशिष्ट आवाज यायचा. तो आला की लगबगीने आत यायचं. मग आपण ताजं दूध ताटलीत ओतलं स्वारी खूष!

ते जसं जसं मोठं होऊ लागलं, तसं बाबांना वाटायला लागलं की त्याला मासे वगैरे द्यायला हवेत. पण आमच्या घरी आम्ही पूर्ण शाकाहारी. ते मासे-चिकन आम्हाला आणायला कसं जमणार? बाबा म्हणाले,आपण जाऊन बघूया fish market  मध्ये. मग मी आणि माझे  बाबा…गेलो पहिल्यांदाच फिश मार्केटला. दारातच आलेल्या फिशच्या वासाने आत जावं की जाऊ नये हा विचार करत असताना एका कोळिणीने आम्हाला पाहिले. आमचे नवखेपण तिने चटकन हेरले. आम्ही ‘खाणार्‍या’तले वाटत नाही हे तिला कळले असावे. तिने बाबांना ‘काय पाहिजे भाऊ?’ असे विचारल्यावर बाबांनी तिला सांगितले की आमच्या मांजराच्या पिल्लासाठी मासे हवे आहेत. तर कुठचे मासे घ्यावेत? मला वाटतं अशा प्रकारची विचित्र मागणी तिच्याकडे पहिल्यांदाच आली असावी. तिने शेजारच्या कोळणीला consult केले. दोघींच्यात काहीतरी चर्चा झाली. तोवर मी आणि बाबा मासळीबाजाराचा असह्य होणारा वास चिकलेटचा गोंडस चेहरा डोळ्यापुढे आणून सुसह्य करत होतो. त्या कोळणीने आमच्या हातात छोट्याछोट्या सुक्या माशांचे पुडके ठेवले. ती म्हणाली, हे त्याला खायला घालून बघा.  सुके मासे बघून बाबांना जरा बरे वाटले. ती कोळीणही अशी की पैसे घेईना. म्हणाली, तुमच्या मांजराने जर हे खाल्ले, तर पुढच्या वेळेपासून माझ्याकडूनच घ्या मासे. तेव्हा घेईन पैसे. ह्याला म्हणतात cusotmer service!

घरी आलो. मासे वगैरे घरात आणायला आईचा विरोध होता. तिचे म्हणणे आजीकडे इतकी मांजरं होती पण कुणी त्यांचे असले लाड केले नाहीत. पण सुकी मासळी बघून तिचा विरोध निवळेल असे आम्हाला वाटत होते. आम्ही घरात पाऊल टाकले आणि चिकलेटने आरडाओरडा करून घर डोक्यावर घेतले. त्याला माशांचा वास आला होता. ती माशांची पुडी पिशवीतून काढून उघडेपर्यंत त्याला धीर धरवत नव्हता. सारखा पंजा मधे मधे घालत होता. ‘म्याव म्याव’ ही मोठं मजेदार करत होता. कारण त्याच्या तोंडाला माशांच्या वासाने पाणी सुटत होतं. शेवटी एकदाची पुडी काढून त्याने मनसोक्त मासे खाल्ले. आणि आमचा जीव भांड्यात पडला!

त्यानंतर हे सुके मासे नियमितपणे आणले जाऊ लागले. गंमत म्हणजे, आधी मासे आणायला विरोध करणारी माझी आई चक्क fish market मध्ये जाऊन मासे आणायची.

या माशांच्या वासामुळे, जवळची इतर मांजरंदेखिल आमच्या घरी यायला लागली. म्हणजे माझे मित्र-मैत्रिणी जितक्या सहजतेने आमच्या घरी यायची तितक्याच हक्काने आमच्या घरातल्या चार पायाच्या या सदस्याचे मित्र-मैत्रिणी आमच्या घरी पुक्खा झोडायला यायला लागले.

meow05.jpg

मी यथावकाश सर्व मांजरांचे नामकरण करून टाकले.

क्रमशः

comfort zone 3

खूप वेळ ते कपाटाखालून बाहेरच आले नाही. मग हळूच डोकं बाहेर काढलं. बहुदा त्याला दूधाचा वास आला होता. ताटली समोरच होती. पण आतापर्यन्त आईचे दूध पित असल्याने त्याला ताटलीतले दूध कसे प्यायचे हे कळत नसणार..कारण त्याने त्याचा पायच दूधात टाकला. झालं! ओलं ओलं पायाला लागल्यावर ते घाबरून परत पळालं. पण या वेळी कपाटाखाली न जाता ते चुकून बाहेरच्या दिशेला गेलं. मी पडद्याच्या मागे उभी असल्याने त्याला
दिसत नव्हते. त्याची चुक त्याच्या लक्षात आली. पण पायाला लागलेलं दूध त्याला अस्वस्थ करत होतं. त्यामुळे ते बसलं आणि पुढच्या पायाचा जो पंजा  दूधात बुडाला होता तो चाटायला लागलं. त्याला दूधाची चव बहुदा आवडली. सगळा पंजा चाटून झाल्यावर त्याने इकडेतिकडे बघून मी जवळपास नाही ना याची खात्री करून घेतली आणि परत दुधाच्या
ताटलीकडे गेलं. आता मात्र त्यात पाय न घालता जवळ जावून त्याचा आधी वास घेतला..मग  स्वतःशीच बोलल्यासारखा ‘म्याव’ असा आवाज घशातून काढला आणि त्याच्या इवल्याश्या गुलाबी-गुलाबी जिभेने दूध पिऊ लागलं. थोडं दूध प्यायल्यावर त्याने पुन्हा कपाटाखाली धूम ठोकली.

मला खूप आनंद झाला.  जे मगाशी प्रचंड गिल्ट फिलिंग आले होते ते जरा कमी झाले.  त्याने दुधाला तोंड लावले नसते तर मला अतिशय वाईट वाटले असते.

आता पुढचा प्रश्न होता की त्या पिल्ल्याचे नाव काय ठेवायचे? माझ्या आजीकडे कित्येक  वर्षे मांजरे होती पण त्यांची नावे वगैरे ठेवण्याचे लाड कुणी केले नव्हते. पण मला माझ्या मांजरांसाठी काहीतरी खास नाव हवं होतं.

ह्या पिल्लाचा रंग चॉकलेटी होता. तेव्हा चॉकलेट नाव ठेवावं असं मनात आलं. पण त्यात गोडवा नव्हता (म्हणजे नावात) …मग बराच विचार केल्यावर ‘चिकलेट’ हे नाव निश्चीत केलं. आणि मला तेव्हा असं वाटलं होतं की ती मांजर आहे.(काही दिवसांनंतर कळलं की तो बोका आहे!!!!)

अशा रितीने मी चिकलेट उर्फ चिक्याचे पालकत्व स्वीकारले!

आणि पालक या नात्याने सगळी जबाबदारी देखील स्वीकारली…पण हे त्याला कळायला हवे होते!

लगेच मी त्याला शहाणं करण्याचा चंग बांधला. म्हटलं त्याला त्याच्या नावाची ओळख झाली पाहिजे. म्हणून त्याला त्याच्या नावाने हाका मारायला सुरूवात केली. ते माझ्या भडिमाराला घाबरुन कपाटाच्या खाली एकदम मागच्या कोपर्‍यात जाऊन बसलं. तेव्हढ्यात आई-बाबा ऑफिसमधून आले. त्यांना माझा पराक्रम सांगितला…बसमधून मांजराचे पिल्लू घेऊन येण्याचा! दोघंही वैतागले. बाबा मला म्हणाले…अगं, ते पिल्लू तुझ्या हातुन निसटून कुठे गाडीखाली आले असते म्हणजे? खरंच मी या गोष्टीचा विचारच केला नव्हता.

आई – बाबा दोघांनाही मांजरे आवडत होती पण आईला जरा काळजी वाटायची की आपण मांजर आणलं तर त्याचं सगळं आपल्या हातून नीट होईल ना? त्यामुळे तिचा जरा विरोध होता. बाबांना सगळ्यांची पिल्लं फार आवडायची…माणसांची देखील! नात्यातल्या, शेजार-पाजारच्या लहान मुलांचे बाबा खूप लाड करायचे. त्यामुळे बाबांचा काहीच विरोध नव्हता.

त्यांनी विचारले, आहे कुठे ते पिल्लू? मग मी कपाटाकडे बोट दाखवलं.  बाबा चक्कं मांडी घालून कपाटासमोर बसले.

त्यांनी  अगदी प्रेमाने चिकलेटला हाका मारायला आणि आपण तान्ह्या बाळांशी कसं ‘सोनुल्या-मोनुल्या, काय कलतो ले लबाड?’ असं लाडाने बोलतो तसं बोलायला सुरूवात केली. त्यांच्या या अशा बोलण्याचा चिकलेटला काय बोध झाला माहित नाही पण ते हळूच बाहेर आलं आणि बाबांकडे बघू लागलं…बाबांनी आपलं बोट दूधात बुडवून त्याच्या समोर धरलं. दूधाचा वास आल्याने चिकलेट त्यांच्याजवळ जाऊन बोट चाटू लागलं.  माझ्या मनात अशी जळफळ झाली ना!

पण त्या इवल्याश्या जीवाला कोण जास्त मॅच्युअर्ड आहे ते एका मिनीटात कळलं!

हळूहळू चिकलेट आमच्या घरात रूळायला लागलं. घरातले सगळे कोपरे, अडचणीच्या जागा त्याच्या आवडत्या झाल्या. भूक लागली की आईकडे जायचं, खेळायला माझ्याकडे यायचं आणि लाड करून घ्यायला बाबांकडे जायचं हे त्याच्या लवकरच लक्षात आलं.

क्रमशः

कम्फर्ट झोन २

ही मुलगी मांजराचे पिल्लू न्यायला आली आहे, तर दादरहून सांताक्रुझला नेणार कसे? आणि मुख्य म्हणजे घरी आईला विचारलय का?  हे तिचे मला प्रश्न…! मी सांगितलं, “आईला विचारत बसले तर कधीही मांजर घरात येणार नाही. तेव्हा डायरेक्ट माऊ घरी घेउनच जाणार आहे. आणि पिल्लू घरी कसं न्यायचं हा काय प्रश्न झाला? एक कापडाची पिशवी दे. त्यात घालून बी.ई.एस.टी.च्या बसने घेऊन जाईन.” माझ्या चेहर्‍यावरचा निर्धार पाहून आजी काही बोलली नाही.

मग मी आमच्या मनुताईंकडे गेले…३ पिल्ले होती…यातलं कुठलं बरं न्यावं असा विचार करत होते. तिन्ही पिल्लं गोंडस होती.त्यातल्या एका पिल्लाचे कान अगदी छान होते…मोठ्या मोठ्या डोळ्यांनी ते माझ्याकडे पाहत होत. मला ते फार आवडले.  तेव्हढ्यात आजी पिशवी घेऊन आली. पिशवी बघितल्यावर मनुताईंना वाटले त्यात तिच्यासाठी काही खाऊ आहे. आली लगेच ‘म्याव म्याव’ करत. आता तिच्यासमोर तिचे पिल्लू उचलून न्यायचे हे मला काही पटेना. मग आजीने तिला स्वैपाकघरात नेऊन दूध दिले. ती आत गेलेली पाहताच मी झटकन ते आवडलेले पिल्लू उचलले, पिशवीत टाकले आणि चपला पायात अडकवून बाहेर पडले. 


पिशवीचे तोंड अलगद बंद केले होते. पिल्लू आतून ओरडत होतं. बसस्टॉप आजीच्या घरासमोरच होता. नशीबाने बसस्टॉपवर पोचल्या पोचल्या  २०१ नंबरची बस आली. दुपारची ३ ची वेळ असल्याने बस अगदी रिकामी होती. बसायला जागा मिळाली. पिशवी मांडीवर ठेवून तिचे तोंड जरा मोकळे केले. पिल्ल्याला श्वास घेता यावा म्हणून. तर आतून साहेब बाहेर यायची धडपड करू लागले. मला जाम टेन्शन आलं. शेजारचा माणूस पिशवीकडे संशयाने बघू लागला. एक दोन स्टॉपनंतर त्याचा स्टॉप आला म्हणून उतरून गेला. आता मला खिडकी मिळाली. तेव्हढ्यात कंडक्टरकाका आले. आता मोठी परीक्षा होती. त्यांना जर काही संशय आला असता तर त्यांनी खाली उतरवले असते. पण एव्हाना  ते पिल्लू माझ्या मांडीवर (अर्थात पिशवीत) छान सेटल झालं होतं. मी छोटीशी फट ठेवली होती…त्यातून त्याला हवा मिळत होती. 
मी माझं तिकीट काढलं. (पिल्लाचं तिकीट काढायची गरज नव्हती…३ वर्षाखालील मुलांना तिकीत लागत नाही!!!) एकदाचा माझा स्टॉप आला. माझं घर स्टॉपपासून जरा लांब होतं. भराभर चालत घरी पोहोचले आणि आधी पिल्लाला पिशवीतून बाहेर काढले. ते तर बिचारं इतकं घाबरून गेलं होतं की त्याला बाहेर काढल्या काढल्या कपाटाच्या खाली जाऊन दडून बसलं. पार भेदरून गेलं होतं बिचारं. त्याला हाका मारून बाहेर बोलवत होते तर ते अजून घाबरून मागे मागे जात होतं. त्यावेळी त्याचा खूप राग आला, म्हटलं एवढ्या प्रेमाने त्याला बोलावते आहे, ते याला समजत कसं नाही? 
मग विचार केला जरा राहू दे त्याला एकटंच…! त्याला तसंच ठेऊन मी आतल्या खोलीत माझं आवरायला गेले.  ५-१० मिनीटांनी बाहेर आले, तेव्हा बघितलं की हे साहेब पण कपाटाच्या खालून थोडंसं डोकं बाहेर काढून आपण कुठे आलो आहोत हे बघत होतं. त्याच्या डोळ्यातलं भय आणि असहाय्यता बघून मला इतकं वाईट वाटलं…की त्या एवढ्याशा जीवावर काय वेळ आणली मी..! छानपैकी आपल्या आईच्या कुशीत पडून दूध प्यायचं आणि भावंडांशी मस्ती करायची एवढंच त्याला माहिती. त्याऐवजी, माझ्या वेड्या हट्टापायी, एक भयाण प्रवास करून आपल्या आईशिवाय या अनोळखी ठिकाणी तो इवलासा जीव भीतीने थरथरत होता. मला खूप पश्चात्ताप व्हायला लागला. वाटलं खूप लहान आहे हे पिल्लू त्याच्या आईशिवाय रहायला. पण मीही ठरवलं की आपण त्याची एखाद्या लहान बाळासारखी काळजी घ्यायची. अगदी त्याच्या आईच्या भूमिकेत शिरायचं. आईच्या भूमिकेत शिरल्यावर पहिली गोष्ट जाणवली की याला भूक तर लागली नसेल? एव्हाना माझी चाहूल लागल्याने ते पुन्हा कपाटाखाली गेलं होतं. मग स्वैपाकघरात जाऊन एका छोट्या ताटलीत दूध आणलं. ते कपाटाच्या समोर ठेवलं आणि मी मुद्दाम आत गेले. 

Comfort zone..1

1031762.jpg

प्रत्येक व्यक्तीला काहीतरी खास आवड किंवा छंद असतो.तो त्याला जपासता येतोच असे
नाही. पण असा काहीतरी विरंगुळा असतो की ज्यात त्याचे मन रमते. एक प्रकारचा ‘कम्फर्ट

झोन’ असतो. वाचन, आवडत्या मालिका पाहणे, खेळणे…एक ना अनेक!
माझाही असाच एक ‘कम्फर्ट झोन’  आहे….जरासा हटके…! तो म्हणजे, माझी मांजरे!
मला अगदी लहानपणापासूनच प्राण्यांची, विशेषतः मांजरांची खूप आवड.
माझे आई वडिल दोघेही नोकरी करत होते.  उन्हाळ्याच्या सुट्टीत घरात मला एकटीला कसं
ठेवणार?  मग माझी रवानगी आजीकडे दादरला व्हायची. पण तिथे माझ्या बरोबरीचे कुणीच
नव्हते. आजी घरकामात असायची. मावशी आणि मामा त्यांच्या व्यापात मग्न असायचे. मग
दिवसभर मी काय करायचं हा प्रश्नच होता. माझ्या आजीचं घर तळमजल्यावर होतं आणि मागे
मोठ्ठी वाडी होती. खूप झाडंदेखील होती. पण त्यामुळे घरात खूप उंदीर यायचे. या
उंदरांच्या उच्छादापासून सुटका मिळावी म्हणून मांजर पाळले होते. ह्या मांजरानी दोन
कामं अगदी चोख केली. एक म्हणजे उंदिर मारले आणि आपल्या गोड वागण्याने मला समस्त
मांजर प्रजातिच्या प्रेमात पाडले.

दुपारी जेवणं झाली की आजी जरा आडवी होत असे. मलाही ती झोपायला सांगत असे. पण मला

जराही झोप यायची नाही. मग इकडे तिकडे टिवल्याबावल्या कर, मासिकं-पुस्तकं वाच असं
काहितरी करत असे. एकदा आमच्या मांजरीने ४ पिल्लं दिली. मग मला दुपारी वेळ कसा
घालवायचा हे प्रश्न पडला नाही. त्या मनीचं आणि तिच्या पिल्लांचं निरीक्षण करण्यात
मस्त वेळ जाऊ लागला. पहिल्यांदा जेव्हा मनीच्या पिल्लांजवळ गेले तेव्हा ती जरा साशंक
नजरेने माझ्याकडे बघत होती. पण २-३ दिवसांत तिची खात्री पटली असावी की माझ्याकडून
पिल्लांना काही धोका संभवत नाहीये, तेव्हा तिने माझी कंपनी तिने स्वीकारली.613223.jpg
ती छोटी छोटी पिल्लं बघून मला आधी जरा विचित्रंच वाटलं. इवलेइवलेसे ते जीव…अजून
त्यांचे डोळेदेखील उघडलेले नव्हते. पायही जरा वाकलेलेच होते. पोट अगदी जमिनीपर्यंत
आलं होतं, पण  टेकत नव्हतं एवढंच!  डोळे बंद असूनदेखील आई जवळ आलेली त्यांना बरोबर
कळायची. मग मात्र आईजवळ जाऊन दूध लुचायला मिळेपर्यंत नुसती गडबड उडायची त्यांची.
आणि आईसाहेबांची स्वच्छतामोहिम चालू व्हायची. सगळ्या पिल्लांना एकदा चाटून काढले की
सुस्कारा टाकायचा!
पिल्लं हळूहळू मोठी होवू लागली. इवलेइवलेसे ते जीव आता डोळे उघडून बघायला लागले.
पायांत अजून ताकद आली नव्हती. पोटं अंगाच्या मानाने जरा मोठीच होती. आपले छोटेसे
डोळे उघडून आजूबाजूचं मोठ्ठं जग त्यांत साठवायचा प्रयत्न करायची. जरा कुठे खुट्ट वाजलं की शेपटी फुलवून पळून जात होती. मला त्यांची शेपटी फार आवडायची.

cat_0031.jpg

या सर्व गोड मांजरांमुळे मला मांजरांचा फार लळा लागला.

आजीकडून माझ्या घरी जायला आता मी फारशी उत्सुक नसायचे. त्यात आई – बाबांजवळ हट्ट चालू केला, आपणही आपल्या घरी मांजर पाळूया.

आईने उत्तम कारणं सांगून मांजर प्रकरण निकालात काढलं. ती म्हणाली, आपलं घर तिसर्‍या मजल्यावर आहे, तेव्हा आपण घरात नसताना माऊला शी/शू करायला बाहेर जायची असेल तर ती कशी जाणार? माझ्याकडे या प्रश्नाला उत्तर नव्हते. त्यामुळे मला गप्प बसायला लागले आणि मांजरांची आवड आजीकडच्या कधीकधीच भेटणार्‍या मांजरांवर भागवावी लागली.

पण काही वर्षांनी माझी ही इच्छा पूर्ण होणार अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे आम्ही तळमजल्यावरच्या मोठ्या जागेत रहायला गेलो. तळमजल्यावर घर असेल तर आईने काढलेली शंका आपोआपच निरसली….! ज्या दिवशी आम्ही या नवीन घरात रहायला गेलो, त्याच्या दुसर्‍या दिवशी मी आजीकडे गेले.  आजीकडच्या मांजरीने महिन्यापूर्वी पिल्ले घातली आहेत हे माहित होते. आजीला सांगितले की मी पिल्लू न्यायला आले आहे. आजी माझ्याकडे पहातच राहिली. असला आचरटपणा करायला मी काही लहान नव्हते..चांगली फर्स्ट इयर बी.कॉम. ला होते. आणि माझी आजी दादरला रहायची आणि मी सांताक्रुझला!

क्रमशः