असाही संवाद…!

तुझ्याशी बोलताना आज काही वेगळंच जाणवलं
अचानक शब्द सुचेनासे झाले, विचारही खुंटले
असं का व्हावं हा विचार करत असताना
अचानक लक्षात आलं की तुझी अवस्थाही
माझ्यासारखीच आहे…….
 
दोघांनाही शब्दांची गरजच राहिली नाही का
एकमेकांशी बोलायला?
 
फोनच्या दुसर्‍या टोकाला तू असावस आणि
एकही शब्द न बोलता माझ्या मनातले
गूज हलकेच समजून घ्यावेस…..
 
गाडीतून दिशाहीन भटकंती करताना
संवाद चालावा तुझ्या हाताचा माझ्या हाताशी…
 
कधीतरी असंही व्हावं…अचानक मिळालेल्या एकांतात
सुंदर काव्य गुंफलं जावं शब्दांशिवाय
उष्ण श्वासांचं, दाहक स्पर्शाचं, उसळणार्‍या आवेगाचं…
 
कधीतरी आजूबाजूच्या माणसांच्या गर्दीत
घुसमटत असताना अचानक तुझ्याशी
नजरानजर व्हावी आणि नजरेनेच द्यावं
शंभर शब्दांचं बळ!
 
तुझ्यामाझ्यात हा संवाद अनंत वेळा होतो….तुझ्यामाझ्या नकळत!