comfort zone 3

खूप वेळ ते कपाटाखालून बाहेरच आले नाही. मग हळूच डोकं बाहेर काढलं. बहुदा त्याला दूधाचा वास आला होता. ताटली समोरच होती. पण आतापर्यन्त आईचे दूध पित असल्याने त्याला ताटलीतले दूध कसे प्यायचे हे कळत नसणार..कारण त्याने त्याचा पायच दूधात टाकला. झालं! ओलं ओलं पायाला लागल्यावर ते घाबरून परत पळालं. पण या वेळी कपाटाखाली न जाता ते चुकून बाहेरच्या दिशेला गेलं. मी पडद्याच्या मागे उभी असल्याने त्याला
दिसत नव्हते. त्याची चुक त्याच्या लक्षात आली. पण पायाला लागलेलं दूध त्याला अस्वस्थ करत होतं. त्यामुळे ते बसलं आणि पुढच्या पायाचा जो पंजा  दूधात बुडाला होता तो चाटायला लागलं. त्याला दूधाची चव बहुदा आवडली. सगळा पंजा चाटून झाल्यावर त्याने इकडेतिकडे बघून मी जवळपास नाही ना याची खात्री करून घेतली आणि परत दुधाच्या
ताटलीकडे गेलं. आता मात्र त्यात पाय न घालता जवळ जावून त्याचा आधी वास घेतला..मग  स्वतःशीच बोलल्यासारखा ‘म्याव’ असा आवाज घशातून काढला आणि त्याच्या इवल्याश्या गुलाबी-गुलाबी जिभेने दूध पिऊ लागलं. थोडं दूध प्यायल्यावर त्याने पुन्हा कपाटाखाली धूम ठोकली.

मला खूप आनंद झाला.  जे मगाशी प्रचंड गिल्ट फिलिंग आले होते ते जरा कमी झाले.  त्याने दुधाला तोंड लावले नसते तर मला अतिशय वाईट वाटले असते.

आता पुढचा प्रश्न होता की त्या पिल्ल्याचे नाव काय ठेवायचे? माझ्या आजीकडे कित्येक  वर्षे मांजरे होती पण त्यांची नावे वगैरे ठेवण्याचे लाड कुणी केले नव्हते. पण मला माझ्या मांजरांसाठी काहीतरी खास नाव हवं होतं.

ह्या पिल्लाचा रंग चॉकलेटी होता. तेव्हा चॉकलेट नाव ठेवावं असं मनात आलं. पण त्यात गोडवा नव्हता (म्हणजे नावात) …मग बराच विचार केल्यावर ‘चिकलेट’ हे नाव निश्चीत केलं. आणि मला तेव्हा असं वाटलं होतं की ती मांजर आहे.(काही दिवसांनंतर कळलं की तो बोका आहे!!!!)

अशा रितीने मी चिकलेट उर्फ चिक्याचे पालकत्व स्वीकारले!

आणि पालक या नात्याने सगळी जबाबदारी देखील स्वीकारली…पण हे त्याला कळायला हवे होते!

लगेच मी त्याला शहाणं करण्याचा चंग बांधला. म्हटलं त्याला त्याच्या नावाची ओळख झाली पाहिजे. म्हणून त्याला त्याच्या नावाने हाका मारायला सुरूवात केली. ते माझ्या भडिमाराला घाबरुन कपाटाच्या खाली एकदम मागच्या कोपर्‍यात जाऊन बसलं. तेव्हढ्यात आई-बाबा ऑफिसमधून आले. त्यांना माझा पराक्रम सांगितला…बसमधून मांजराचे पिल्लू घेऊन येण्याचा! दोघंही वैतागले. बाबा मला म्हणाले…अगं, ते पिल्लू तुझ्या हातुन निसटून कुठे गाडीखाली आले असते म्हणजे? खरंच मी या गोष्टीचा विचारच केला नव्हता.

आई – बाबा दोघांनाही मांजरे आवडत होती पण आईला जरा काळजी वाटायची की आपण मांजर आणलं तर त्याचं सगळं आपल्या हातून नीट होईल ना? त्यामुळे तिचा जरा विरोध होता. बाबांना सगळ्यांची पिल्लं फार आवडायची…माणसांची देखील! नात्यातल्या, शेजार-पाजारच्या लहान मुलांचे बाबा खूप लाड करायचे. त्यामुळे बाबांचा काहीच विरोध नव्हता.

त्यांनी विचारले, आहे कुठे ते पिल्लू? मग मी कपाटाकडे बोट दाखवलं.  बाबा चक्कं मांडी घालून कपाटासमोर बसले.

त्यांनी  अगदी प्रेमाने चिकलेटला हाका मारायला आणि आपण तान्ह्या बाळांशी कसं ‘सोनुल्या-मोनुल्या, काय कलतो ले लबाड?’ असं लाडाने बोलतो तसं बोलायला सुरूवात केली. त्यांच्या या अशा बोलण्याचा चिकलेटला काय बोध झाला माहित नाही पण ते हळूच बाहेर आलं आणि बाबांकडे बघू लागलं…बाबांनी आपलं बोट दूधात बुडवून त्याच्या समोर धरलं. दूधाचा वास आल्याने चिकलेट त्यांच्याजवळ जाऊन बोट चाटू लागलं.  माझ्या मनात अशी जळफळ झाली ना!

पण त्या इवल्याश्या जीवाला कोण जास्त मॅच्युअर्ड आहे ते एका मिनीटात कळलं!

हळूहळू चिकलेट आमच्या घरात रूळायला लागलं. घरातले सगळे कोपरे, अडचणीच्या जागा त्याच्या आवडत्या झाल्या. भूक लागली की आईकडे जायचं, खेळायला माझ्याकडे यायचं आणि लाड करून घ्यायला बाबांकडे जायचं हे त्याच्या लवकरच लक्षात आलं.

क्रमशः

कम्फर्ट झोन २

ही मुलगी मांजराचे पिल्लू न्यायला आली आहे, तर दादरहून सांताक्रुझला नेणार कसे? आणि मुख्य म्हणजे घरी आईला विचारलय का?  हे तिचे मला प्रश्न…! मी सांगितलं, “आईला विचारत बसले तर कधीही मांजर घरात येणार नाही. तेव्हा डायरेक्ट माऊ घरी घेउनच जाणार आहे. आणि पिल्लू घरी कसं न्यायचं हा काय प्रश्न झाला? एक कापडाची पिशवी दे. त्यात घालून बी.ई.एस.टी.च्या बसने घेऊन जाईन.” माझ्या चेहर्‍यावरचा निर्धार पाहून आजी काही बोलली नाही.

मग मी आमच्या मनुताईंकडे गेले…३ पिल्ले होती…यातलं कुठलं बरं न्यावं असा विचार करत होते. तिन्ही पिल्लं गोंडस होती.त्यातल्या एका पिल्लाचे कान अगदी छान होते…मोठ्या मोठ्या डोळ्यांनी ते माझ्याकडे पाहत होत. मला ते फार आवडले.  तेव्हढ्यात आजी पिशवी घेऊन आली. पिशवी बघितल्यावर मनुताईंना वाटले त्यात तिच्यासाठी काही खाऊ आहे. आली लगेच ‘म्याव म्याव’ करत. आता तिच्यासमोर तिचे पिल्लू उचलून न्यायचे हे मला काही पटेना. मग आजीने तिला स्वैपाकघरात नेऊन दूध दिले. ती आत गेलेली पाहताच मी झटकन ते आवडलेले पिल्लू उचलले, पिशवीत टाकले आणि चपला पायात अडकवून बाहेर पडले. 


पिशवीचे तोंड अलगद बंद केले होते. पिल्लू आतून ओरडत होतं. बसस्टॉप आजीच्या घरासमोरच होता. नशीबाने बसस्टॉपवर पोचल्या पोचल्या  २०१ नंबरची बस आली. दुपारची ३ ची वेळ असल्याने बस अगदी रिकामी होती. बसायला जागा मिळाली. पिशवी मांडीवर ठेवून तिचे तोंड जरा मोकळे केले. पिल्ल्याला श्वास घेता यावा म्हणून. तर आतून साहेब बाहेर यायची धडपड करू लागले. मला जाम टेन्शन आलं. शेजारचा माणूस पिशवीकडे संशयाने बघू लागला. एक दोन स्टॉपनंतर त्याचा स्टॉप आला म्हणून उतरून गेला. आता मला खिडकी मिळाली. तेव्हढ्यात कंडक्टरकाका आले. आता मोठी परीक्षा होती. त्यांना जर काही संशय आला असता तर त्यांनी खाली उतरवले असते. पण एव्हाना  ते पिल्लू माझ्या मांडीवर (अर्थात पिशवीत) छान सेटल झालं होतं. मी छोटीशी फट ठेवली होती…त्यातून त्याला हवा मिळत होती. 
मी माझं तिकीट काढलं. (पिल्लाचं तिकीट काढायची गरज नव्हती…३ वर्षाखालील मुलांना तिकीत लागत नाही!!!) एकदाचा माझा स्टॉप आला. माझं घर स्टॉपपासून जरा लांब होतं. भराभर चालत घरी पोहोचले आणि आधी पिल्लाला पिशवीतून बाहेर काढले. ते तर बिचारं इतकं घाबरून गेलं होतं की त्याला बाहेर काढल्या काढल्या कपाटाच्या खाली जाऊन दडून बसलं. पार भेदरून गेलं होतं बिचारं. त्याला हाका मारून बाहेर बोलवत होते तर ते अजून घाबरून मागे मागे जात होतं. त्यावेळी त्याचा खूप राग आला, म्हटलं एवढ्या प्रेमाने त्याला बोलावते आहे, ते याला समजत कसं नाही? 
मग विचार केला जरा राहू दे त्याला एकटंच…! त्याला तसंच ठेऊन मी आतल्या खोलीत माझं आवरायला गेले.  ५-१० मिनीटांनी बाहेर आले, तेव्हा बघितलं की हे साहेब पण कपाटाच्या खालून थोडंसं डोकं बाहेर काढून आपण कुठे आलो आहोत हे बघत होतं. त्याच्या डोळ्यातलं भय आणि असहाय्यता बघून मला इतकं वाईट वाटलं…की त्या एवढ्याशा जीवावर काय वेळ आणली मी..! छानपैकी आपल्या आईच्या कुशीत पडून दूध प्यायचं आणि भावंडांशी मस्ती करायची एवढंच त्याला माहिती. त्याऐवजी, माझ्या वेड्या हट्टापायी, एक भयाण प्रवास करून आपल्या आईशिवाय या अनोळखी ठिकाणी तो इवलासा जीव भीतीने थरथरत होता. मला खूप पश्चात्ताप व्हायला लागला. वाटलं खूप लहान आहे हे पिल्लू त्याच्या आईशिवाय रहायला. पण मीही ठरवलं की आपण त्याची एखाद्या लहान बाळासारखी काळजी घ्यायची. अगदी त्याच्या आईच्या भूमिकेत शिरायचं. आईच्या भूमिकेत शिरल्यावर पहिली गोष्ट जाणवली की याला भूक तर लागली नसेल? एव्हाना माझी चाहूल लागल्याने ते पुन्हा कपाटाखाली गेलं होतं. मग स्वैपाकघरात जाऊन एका छोट्या ताटलीत दूध आणलं. ते कपाटाच्या समोर ठेवलं आणि मी मुद्दाम आत गेले. 

Comfort zone..1

1031762.jpg

प्रत्येक व्यक्तीला काहीतरी खास आवड किंवा छंद असतो.तो त्याला जपासता येतोच असे
नाही. पण असा काहीतरी विरंगुळा असतो की ज्यात त्याचे मन रमते. एक प्रकारचा ‘कम्फर्ट

झोन’ असतो. वाचन, आवडत्या मालिका पाहणे, खेळणे…एक ना अनेक!
माझाही असाच एक ‘कम्फर्ट झोन’  आहे….जरासा हटके…! तो म्हणजे, माझी मांजरे!
मला अगदी लहानपणापासूनच प्राण्यांची, विशेषतः मांजरांची खूप आवड.
माझे आई वडिल दोघेही नोकरी करत होते.  उन्हाळ्याच्या सुट्टीत घरात मला एकटीला कसं
ठेवणार?  मग माझी रवानगी आजीकडे दादरला व्हायची. पण तिथे माझ्या बरोबरीचे कुणीच
नव्हते. आजी घरकामात असायची. मावशी आणि मामा त्यांच्या व्यापात मग्न असायचे. मग
दिवसभर मी काय करायचं हा प्रश्नच होता. माझ्या आजीचं घर तळमजल्यावर होतं आणि मागे
मोठ्ठी वाडी होती. खूप झाडंदेखील होती. पण त्यामुळे घरात खूप उंदीर यायचे. या
उंदरांच्या उच्छादापासून सुटका मिळावी म्हणून मांजर पाळले होते. ह्या मांजरानी दोन
कामं अगदी चोख केली. एक म्हणजे उंदिर मारले आणि आपल्या गोड वागण्याने मला समस्त
मांजर प्रजातिच्या प्रेमात पाडले.

दुपारी जेवणं झाली की आजी जरा आडवी होत असे. मलाही ती झोपायला सांगत असे. पण मला

जराही झोप यायची नाही. मग इकडे तिकडे टिवल्याबावल्या कर, मासिकं-पुस्तकं वाच असं
काहितरी करत असे. एकदा आमच्या मांजरीने ४ पिल्लं दिली. मग मला दुपारी वेळ कसा
घालवायचा हे प्रश्न पडला नाही. त्या मनीचं आणि तिच्या पिल्लांचं निरीक्षण करण्यात
मस्त वेळ जाऊ लागला. पहिल्यांदा जेव्हा मनीच्या पिल्लांजवळ गेले तेव्हा ती जरा साशंक
नजरेने माझ्याकडे बघत होती. पण २-३ दिवसांत तिची खात्री पटली असावी की माझ्याकडून
पिल्लांना काही धोका संभवत नाहीये, तेव्हा तिने माझी कंपनी तिने स्वीकारली.613223.jpg
ती छोटी छोटी पिल्लं बघून मला आधी जरा विचित्रंच वाटलं. इवलेइवलेसे ते जीव…अजून
त्यांचे डोळेदेखील उघडलेले नव्हते. पायही जरा वाकलेलेच होते. पोट अगदी जमिनीपर्यंत
आलं होतं, पण  टेकत नव्हतं एवढंच!  डोळे बंद असूनदेखील आई जवळ आलेली त्यांना बरोबर
कळायची. मग मात्र आईजवळ जाऊन दूध लुचायला मिळेपर्यंत नुसती गडबड उडायची त्यांची.
आणि आईसाहेबांची स्वच्छतामोहिम चालू व्हायची. सगळ्या पिल्लांना एकदा चाटून काढले की
सुस्कारा टाकायचा!
पिल्लं हळूहळू मोठी होवू लागली. इवलेइवलेसे ते जीव आता डोळे उघडून बघायला लागले.
पायांत अजून ताकद आली नव्हती. पोटं अंगाच्या मानाने जरा मोठीच होती. आपले छोटेसे
डोळे उघडून आजूबाजूचं मोठ्ठं जग त्यांत साठवायचा प्रयत्न करायची. जरा कुठे खुट्ट वाजलं की शेपटी फुलवून पळून जात होती. मला त्यांची शेपटी फार आवडायची.

cat_0031.jpg

या सर्व गोड मांजरांमुळे मला मांजरांचा फार लळा लागला.

आजीकडून माझ्या घरी जायला आता मी फारशी उत्सुक नसायचे. त्यात आई – बाबांजवळ हट्ट चालू केला, आपणही आपल्या घरी मांजर पाळूया.

आईने उत्तम कारणं सांगून मांजर प्रकरण निकालात काढलं. ती म्हणाली, आपलं घर तिसर्‍या मजल्यावर आहे, तेव्हा आपण घरात नसताना माऊला शी/शू करायला बाहेर जायची असेल तर ती कशी जाणार? माझ्याकडे या प्रश्नाला उत्तर नव्हते. त्यामुळे मला गप्प बसायला लागले आणि मांजरांची आवड आजीकडच्या कधीकधीच भेटणार्‍या मांजरांवर भागवावी लागली.

पण काही वर्षांनी माझी ही इच्छा पूर्ण होणार अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे आम्ही तळमजल्यावरच्या मोठ्या जागेत रहायला गेलो. तळमजल्यावर घर असेल तर आईने काढलेली शंका आपोआपच निरसली….! ज्या दिवशी आम्ही या नवीन घरात रहायला गेलो, त्याच्या दुसर्‍या दिवशी मी आजीकडे गेले.  आजीकडच्या मांजरीने महिन्यापूर्वी पिल्ले घातली आहेत हे माहित होते. आजीला सांगितले की मी पिल्लू न्यायला आले आहे. आजी माझ्याकडे पहातच राहिली. असला आचरटपणा करायला मी काही लहान नव्हते..चांगली फर्स्ट इयर बी.कॉम. ला होते. आणि माझी आजी दादरला रहायची आणि मी सांताक्रुझला!

क्रमशः

तू आणि मी

तू असशील तर आयुष्याला अर्थ आहे

तू नसशील तर आयुष्य व्यर्थ आहे

तू असशील तर आयुष्य रम्य आहे

तू नसशील तर आयुष्यात काय गम्य आहे?

तू असशील तर आयुष्य सन्चिताचे फलित आहे

तू नसशील तर आयुष्य चुकलेले गणित आहे

तू असलास तर जीवन स्वप्नांची बाग आहे

तू नसलास तर आयुष्य जाळणारी आग आहे..

तुझ्या मनी तेच माझ्या मनी हा आजवरचा अनुभव आहे…

कारण तुझं मन जर आरसा तर माझं मन प्रतिबिंब आहे…

थोडक्यात काय…?

तर..

तुझ्या माझ्या सहवासाची गोडी अवीट आहे

तुझं माझं नातं हे पूर्णत्वाचं प्रतिक आहे….!!!