शांततेचा आवाज

जंगल भटकंतीच्या निमित्ताने अनेकदा जंगलात, शहरापासून दूर जाणं होतं . या भटकंतीमध्ये सर्वात जास्त काय अपील होतं, तर तिथली शांतता! जंगलातल्या एखाद्या तळ्याच्या काठी जर आपण बसलो, तर तिथे खूप छान शांतता अनुभवायला मिळते. आपण एखादी सावलीची जागा धरून बसायचं . समोर छानसं तळे आणि त्याच्या आजूबाजूला गर्द झाडी ! सगळीकडे एक सुंदर स्तब्धता !आपण तिथे नुसतं बसून तिथली शांतता अनुभवत,आजूबाजूच्या परिसराचं निरीक्षण करत राहायचं! जसे जसे आपण शांत बसून रहातो, तसं तसं आपल्याला जाणवायला लागतं, की जरी सभोवती शांतता असली, तरी निश्चलता नाहीये. मध्येच वाऱ्याची एखादी झुळूक येते आणि पाण्यावर तरंग उमटवून जाते. पाण्यातला एखादा खोडकर मासा हळूच पृष्ठभागावर डोकावतो, आणि पाण्यात वलयं तयार करतो. काठावरच्या रानफुलांवर विविध फुलपाखरं भिरभिरतायत. एखाद- दुसरा छोटासा पक्षी घाईघाईने एका झाडावरून उडून दुसऱ्या झाडाच्या पानांमध्ये लुप्त होतोय. मध्येच एखाद्या झाडाची दोन चार चुकार पाने निःशब्दपणे धारातीर्थी पडताहेत. एखाद्या पक्ष्याचा वा प्राण्याचा आवाज जरी ऐकू आला, तरी तो त्या शांततेचा भंग करत नाही, तिला एक वेगळी खोली देऊन जातो. मग इथली शांतता हलकेच आपलया कानात कुजबुजते – तू सुद्धा आतून असाच हो – शांत आणि निर्मल! जंगलातून घरी गेलं, तरी या शांततेचा आवाज खूप दिवस ऐकू येत राहतो, शहराच्या गोंगाटात पूर्ण दाबून जाईपर्यंत. मग पुन्हा ओढ लागते, परत जंगलात जायची!

सध्या लॉक डाऊन मुळे शाळा, कॉलेजेस , ऑफिस सर्व बंद आहे आणि रस्त्यांवरची वर्दळ, वाहने अगदी मोजकी आहे. त्यामुळे आता आपल्याला थोडे दिवस तरी शहरातच या अत्यंत दुर्मिळ अशा शांततेचा अनुभव घेता येतो आहे ! पण त्या तळ्याकाठी अनुभवलेल्या शांततेचा निर्मळपणा या शांततेत जाणवत नाही. या शांततेचा आवाजही कुजबुजता – पण दहशत निर्माण करणारा…..अस्वस्थ करून टाकणारा. प्रत्येकाच्या मनात एकाच शंका – ही वादळापूर्वीची शांतता तर ठरणार नाही ना? आज प्रत्येकाच्या डोळ्यात उद्याच्या अनिश्चिततेचं प्रश्नचिन्ह आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या हजारो लोकांचे आज रिकामे हात, रिते खिसे, भकास डोळे आणि उजाड मने ! एका विषाणूच्या स्फोटाने त्यांच्या छोट्या छोट्या स्वप्नांच्या उडालेल्या चिंधड्या या शांततेचा आवाज अजून भयाण करत आहे.

हे विधात्या, अतिगर्विष्ठ आणि उन्मत्त झालेल्या या मनुष्य प्राण्याला स्वतःच्या आत डोकावून बघून अंतरात्म्याचा क्षीण झालेला आवाज ऐकण्यासाठी तर ही शांतता प्रस्थापित केली नाहीसा ना ?

रविवार सकाळ ..३

मला नेहमी असे वाटते की प्रत्येक वाराचा एक स्वभाव असतो.

सोमवार…रुक्ष आणि कर्तव्यकठोर…’चला..कामाला लागा!’ अशी ऑर्डर देणारा.
मंगळवार…कामसू…सोमवारचा धाकटा भाऊच जणू!
बुधवार…गुलहौशी… जणू वीकएण्ड चा छोटा भाऊ…कारण हा कुठल्याही एका देवतेचा वार म्हणून पाळला जात नाही, त्यामुळे ठराविक दिवशी नॉन-व्हेज खाणारी मंडळी मिनी पार्टी मूड मध्ये असतात.
गुरूवार…धीरगंभीर!
शुक्रवार…सकाळी कामसू आणि संध्याकाळी उडाणटप्पू
शनिवार…मोकळाढाकळा…दिलखुलास
रविवार…हा पाण्यासारखा…प्रत्येकाचा हक्काचा…ज्याला जसा पाहिजे तसा होणारा…

माझ्यासाठी रविवार म्हणजे माझा सखा! कधी त्याला साफसफाईला जुंपते, तर कधी शॉपिंगला घेऊन जाते. कधी घरच्यांबरोबर मस्त जेवणाचा बेत, तर कधी काहीएक न करता नुसता आराम! मात्र रविवार सकाळ मात्र फक्त माझी. जणू अत्तराची कुपीच! सकाळच्या त्या दोन तासांच्या शिदोरीवर बाकीचा आठवडा काढायचा. रविवारी उशिरापर्यंत अंथरूणात लोळत पडणार्‍यांपैकी मी नाही. रोजच्या वेळेलाच शक्यतो ऊठून तयार होते बाहेर पडते, माझ्या आठवडी शिदोरीसाठी!

आमच्या ठाण्यात आणि ठाण्याच्या जवळपास खूप छान ग्रीन पॅचेस आहेत. त्यापैकी एखाद्या ठिकाणी रविवारी सकाळी जाते. तिथली हिरवाई मनात साठवून घेते. कधी पक्षीनिरीक्षणासाठी एखाद्या ग्रुपबरोबर जाते. आसपासचा निसर्ग कधी डोळ्यात, तर कधी कॅमेरात साठवून आणते. मला ही सगळी हिरवाई, प्राणी, पक्षी खूप आपले वाटतात. नक्की काय मिळतं मला यातून?

मला एक दुवा, एक कनेक्ट सापडतो…त्या परमेश्वराने घडवलेल्या जगडव्याळ अतिक्लीष्ट पसार्‍याबरोबर.

आणि एक समाधानही मिळते…अचंबित करणार्‍या या पसार्‍याचं निरीक्षण करता करता…त्याच्या निर्मात्याशी एक indirect connect निर्माण झाल्याचे!

ताजे पाणी….???

आमच्या ठाण्यात सध्या आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात चालू आहे. दोन दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने, सगळ्या घरांमध्ये बादल्या, पिंप, कळश्या, पातेली, मोठी भांडी…आणि काही घरांमध्ये पेले व वाट्या यामध्ये ही पाण्याचा साठा करून ठेवलेला दिसतो.
बरेचदा हा साठा दोन नाही, तर चक्क ४-५ दिवस पुरेल इतका जास्त असतो.

दोन दिवसांनी जेव्हा पालिकेचे पाणी येते, तेव्हा साहजिकच अगोदर बरेचसे साठवलेले पाणी शिल्लक असते. मग ताजे पाणी आले म्हणून हे शिल्लक राहिलेले पाणी ओतून टाकण्यात येते.प्रत्येक घरातले थोडे थोडे मिळून हजारो लिटर पाणी वाया जाते. केवळ एका खुळचट समजूतीने, ’ ताजे पाणी’.

वस्तुत: ज्या ठिकाणी धरणातून पाणीपुरवठा होतो, तो मागच्या वर्षी जो पाऊस पडलेला असतो, त्या पावसाच्या साठवलेल्या पाण्यातून होतो. म्हणजे, जे पाणी आपण ’ताजे’ म्हणून कौतुकाने पितो, ते साधारणत: ८-९ महिने आधीचे असते. केवळ आपल्या घरी पालिकेद्वारे त्या दिवशी ते येत असते.

जिथे नदी अथवा विहिरीचे पाणी वापरले जाते, तिथे ताजे पाणी ही संकल्पना योग्य ठरते कारण भूमिगत जलस्त्रोतांमुळे सतत ताजे पाणी येत असते.

आपण शहरातील लोकांनी खालील गोष्टींचे पालन केले, तर ’ताजे पाणी’ ह्या चुकीच्या समजूतीमुळे होणारी पाण्याची ही नासाडी सहज टाळू शकतो.

१. जरुरीपुरतेच पाणी साठवून ठेवावे. म्हणजे अतिरिक्त न वापरलेले पाणी ओतून टकण्याचा प्रश्नच येणार नाही.
२. ताजे पाणी आणि शिळे पाणी ह्या कल्पनांना तिलांजली द्यावी.
३. वरील मुद्दे चटकन अंगवळणी पडत नसतील, तर तोवर हे राहिलेले पाणी ओतून न देता, इतर घरगुती गरजांसाठी वापरावे.

’जल है, तो कल है’

अकेले है… तो क्या गम है…

मे महिन्यातली टळटळीत दुपार. ऑफिसमध्ये मीटिंग चालू होती. ए.सी. चालू असूनही शाब्दिक चकमकीमुळे मीटिन्गरूम चांगलीच तापली होती. अचानक बॉसने सुचवले की जरा चहा/ कॉफीचा ब्रेक घेऊया. या सूचनेमुळे सगळे जरा सैलावले आणि चहा/ कॉफी घेण्यासाठी बाहेर गेले. मी चहा/ कॉफी घेत नसल्याने आतच थांबले. जरा खिडकीपाशी आले. बाहेरचे रणरणते ऊन डोळे दिपवत होते. पूर्ण रस्ता निर्मनुष्य होता. मला वाटतं बाहेर एक वार्‍याची झुळूक आली असावी. कारण खिडकीच्या समोरचा पिंपळ मस्त सळसळला. इतक्या दिवसांत हा पिंपळ कधी नोटिस केला नव्हता. पण आज बाहेरच्या निर्मनुष्य स्तब्धतेत त्याच्या पानांच्या सळसळीमुळे त्याच्याकडे लक्ष वेधले गेले.

तो पिंपळ काही खूप मोठा वृक्ष नव्हता. पण अगदीच रोपटेही नही. माणसांच्या परिमाणात सांगायचे झाले तर, नुकतेच मिसरूड फुटलेला मुलगा असतो ना पौंगडावस्थेतला, अगदी तसाच मला तो भासला.

अंगावर तीन छ्टातली पाने मिरवत होता. काही गर्द हिरवी, काही पोपटी तर काही नाजूक कोवळी गुलाबी.पुन्हा एक झुळूक आली…आधीच्यापेक्षा जरा जोरदार. आधीपेक्षा अजून जोरात पानांची सळ्सळ झाली. असं वाटलं जणू अंग घुसळून मुक्त हसत होता…आनंदाने! इतक्या रणरणत्या उन्हातही किती खूष दिसत होता. जणू चांदण्याचा शीतल शिडकावाच होत होता त्याच्या अंगावर.

आजूबाजूला एकही झाड नाही. पूर्ण डांबरी रस्त्यावर हा एकटाच! तरीही आपला आनंद आपणच शोधतोय. आपणच आपला सोबती. काही दुखलं, खुपलं तरी स्वत:च स्वत:चा सवंगडी. जणू पाडगावकरांची कविताच जगत होता…

आपलं गाणं आपल्याला गाता आलं पाहिजे…

आणि एकटं एकटं पुढे जाता आलं पाहिजे…

मग त्या ऑफिसमध्ये मी असेपर्यंत एक बंध निर्माण झाला त्याच्यामाझ्यात. त्याच्याकडे बघून ऒळखीचे स्मित चेहर्‍यावर यायला लागले.

काही महिन्यांनी माझं ऑफिस दुसरीकडे गेलं…शहराच्या दुसर्‍या टोकाला. त्याची माझी प्रत्यक्ष भेट नाही झाली तरी तो एकाच वेळी दोन ठिकाणी अस्तित्वात आहे. एक त्याच्या जागेवर आणि दुसरा माझ्या मनात….!

हृदयस्थो जनार्दन:

गुढी पाडवा ते राम नवमी, चैत्र नवरात्र साजरी करतात. या दरम्यान रोज वाटत होतं  की, देवळात जावं.  पण माझ्या ऑफिसच्या विचित्र टाईमिंग मुळे जमलंच नाही.  तसं बघयला  गेलं तर, आई गेल्यानंतर तेराव्या दिवशी देवळात जाऊन आले, त्यानंतर देवळात गेलेच  नव्हते. काल राम नवमी झाली. काल तर रात्री घरी यायला अकरा वाजले. आज शनिवार. विचार  केला, आज सुट्टी आहे. आज देवळात जायचंच. देवळात गेलं ना, की आपल्यातल्या ईश्वरी  अंशाची जाणीव होते. देवापुढे हात जोडले, की मी नेहमी    होते. काय मागायचं ते कळतच  नाही. डोळ्यातल्या पाण्यामुळे देवाची मूर्ती धूसर दिसायला लागली, की मागल्या पावली  निघून येते. पण तरीही मला देवळात जायला खूप आवडतं. शक्यतो मी कमी गर्दीच्या आणि  नवसाला न पावणार्‍या देवाच्या देवळात जाते. मागायचं काहीच नसतं, मग नवसाला  पावणर्‍या देवळात कशाला जा?

आज सकाळी जागही नेहमीप्रमाणे सहा वाजताच आली. मनात विचार केला, दोन महिन्यात  बागेत फिरायलाही गेलेले नाही. आज जरा चक्कर टाकून येऊया. म्हणून झट्पट तयारी करून  बागेत गेले. आमच्या ठाण्यात दत्ताजी साळवी निसर्ग उद्यान आहे. खूप वेगवेगळ्या  प्रकारची फुलझाडे आणि अनेक औषधी वनस्पती तिथे आहेत. हे उद्यान आहे लहानसेच, पण  वैविध्यपूर्ण आहे! बागेत गेले, तर सगळीकडे वसंत ऋतूच्या खुणा जागोजागी दिसत होत्या. बागेत शिरल्याशिरल्याच एक छोटंसं तळं आहे, त्यात एक पिवळ्या रंगाचं कमळ नुकतंच उमलत  होतं. अर्धवट उमललेलं ते कमळ इतकं सुरेख दिसत होतं! नुकतंच झोपेतून जागं झालेलं, डोळे किलकिले करून बघणारं  तान्ह बाळच जणू!  त्याच्या बाजूला दोन गुलाबी कमळं पूर्ण  उमलली होती. मंद वार्‍यावर झोके घेत मला जणू सांगत होती, “बघ, आम्ही दोघं कसे लवकर  फुलून तयार झालो. तो पिवळ्या अजून अर्धवट झोपेतच आहे!!”

बागेतले माळीदादा, झाडंना पाणी घालायचे काम मोठे मन लावून करत होते. पाण्याचा व  मातीचा एकत्रित असा मस्त सुगन्ध येत होता. पाण्यामुळे सर्व झाडांवर एक तरतरी, तजेला  आला होता. कितीतरी वेगवेगळी फुले फुलली होती. पांढरा आणि पिवळा कांचन तर फुलांनी  अक्षरशः डवरला होता. जांभळ्या, पिवळ्या रंगाची खूप इटुकली फुले(ज्यांची नावे मला  माहित नाहीत), गोकर्ण, मुकी जास्वंद, जुई, चमेली…किती सांगू…सगळ्यांना बहर आला  होता. सार्वजनिक बागेत फुलांचे असे सुखरूप दर्शन होणे जरा दुर्मिळच गोष्ट आहे! या  सगळ्यामधून चालता चालता, कुठेतरी वाचलेला एक जपानी हायकू आठवला,

मी झाडाला विचारलं

“झाडा,झाडा, मला  ईश्वराविषयी सांग.”

झाड फुलांनी बहरून  आलं…

मी चालता चालता थबकले. आज मी देवळात जायचं ठरवलं होतं ना? मग कुठे आहे मी आत्ता? ईश्वराचे याहून अधिक चांगले दर्शन मला मानवानिर्मित देवळात होईल काय? प्रत्येक फुल, पान, फांदी, झाड मला काहीतरी सांगत होतं का? त्याच्या अस्तित्त्वाच्या खुणांमधून मी  चालत होते…कुठल्या देवळात जायचं याचा विचार करत! आतून काहीतरी उचंबळून आलं. आपण  किती यंत्रवत झालो आहोत याची जाणीव झाली. मला चालवेचना पुढे! एका बाकावर बसले. सभोवतालच्या झाडा, पाना, फुलांकडे थोड्याश्या असूयेनेच पाहत होते. वाटले किती सहज  नैसर्गिकता आहे या सगळ्यांच्यात. ईश्वराने जो जीवनक्रम ठरवून दिला तो अन्तर्गत  प्रेरणेने अचूक जाणून घेऊन कित्येक वर्षे ऋतूचक्राच्या फेर्‍या करत असतात. आंब्याला  कोण सांगतं कधी मोहोर यायला हवा, कधी कैरी धरायला हवी आणि कधी आंबा पिकायला हवा? मगर अंडी घालते, त्यातून ७० व्या दिवशी पिल्ले बाहेर येतात. त्या दिवशी मुसळधार  पाऊस हमखास असतो. तिला ७० दिवस आधी कोणतं हवामान खातं हवामानाचा अंदाज देतं? गवताचं  लहानसं पातंही जर त्याच्या सूचनेप्रमाणे उ’गवत’ असेल, तर मग एव्हढी हुशार माणूसजात, का इतक्या निर्मळपणे वागू शकत नाही? मनुष्य ईश्वराची निर्मिती नाही का? अनेकांची  आयुष्य सरत येतात, पण नेमके कशासाठी जन्मलो, हेच उमगलेले नसते. का हे असे  व्हावे? आपल्या आतही ईश्वराचा अंश असेलच ना? किंबहुना आहेच प्रत्येकाच्या ठायी तो. मग तो का  नाही जाणवत आपल्याला? ह्या ‘हृदयस्थो जनार्दन:’  ला कसा शोधायचा? हृदयाच्या कुठल्या  टेस्टमधे सापडेल का? न उलगडणारं कोडं…ज्यांना सुटलं…त्यांना दंडवत

आसाम, अरुणाचल प्रदेश, नागलॅंड – भाग २

आमच्या या १३ दिवसांच्या टूरचे मुख्य आकर्षण होते, अरुणाचल प्रदेशमधील तवांग. नामेरीहून आम्ही निघालो, ते साधारण ३६५-३८० कि.मी. वर असलेल्या तवांगला जायलाच. परंतु हा सर्व प्रवास डोंगराळ प्रदेशातून होता. रस्तेही कच्चे आणि खराब होते. त्यामुळे नामेरीपासून १८० कि.मी. असलेल्या दिरांग या ठिकाणी आमचा रात्रीचा मुक्काम होता. आम्ही आसाम-अरुणाचलच्या बॉर्डरवरील भालूकपॉन्ग या गावी पोहोचलो. दुपारचे साधारण १२ वा़जले होते. पुढच्या प्रवासात हॉटेल मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने आम्ही इथे जेवून घेतले.इथे आमची Inner Line Permits तपासण्यात आली. सगळ्या गाड्यांची नोंदणी करण्यात आली, आणि आम्ही अरुणाचलमध्ये प्रवेश केला. इतका वेळ दूर दूर दिसणारे डोंगर आता जवळ दिसायला लागले. हळूहळू चढावाला सुरुवात झाली.नागमोडी वळणाचे रस्ते सुरू झाले. त्यामुळे गाडीचा वेग बराच मंदावला. सुरूवातीला चांगले असणारे रस्ते आता आपले खरे स्वरूप दाखवायला लागले. अरुणाचल प्रदेशात पाण्याचे स्त्रोत विपुल प्रमाणात आहे. डोंगरातून हे पाणी ओहोळ, झरे या स्वरूपात सारखे रस्त्यांवर येत असते. हे पाणी आपल्याबरोबर माती, लहान दगड घेऊन येते.त्यामुळे रस्त्यावर कायम चिखल होतो. कितीही चांगले रस्तेकाही काळानंतर खराब होतात. आपले BRO (Border Road Organisation)  हे रस्ते नीट ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असते. आधी एवढ्या अवघड डोंगररांगातून रस्ते तयार करणं हे शिवधनुष्य पेलल्यासारखे आहे. BRO ला त्यासाठी शेकडो सलाम! एका बाजूला डोंगर आणि दुसर्‍या बाजूला दरी, मधोमध रस्ता. सगळीकडे हिरवीगार गच्च झाडी दिसत होती. मधे मधे रानकेळी फोफावल्या होत्या. पोपटी हिरव्या पासून गर्द हिरव्या रंगाच्या विविध छटा बघायला मिळत होत्या. जिथे नजर टाकावी तिथे हिरवा शेला ल्यायलेले डोंगर दिसत होते.

Image

जसे जसे आम्ही वर जात होतो, तशा पलिकडच्या डोंगररांगा नजरेस पडायला लागल्या. आजचा प्रवास जरी १८० कि.मी.चाच असला, तरी त्याला ८ तास लागणार होते. २-३ तास प्रवास झाल्यावर चिन्मयने सहजच आमच्या driver ला विचारले, दिरांग नक्की कुठे आहे? आमचा driver अगदी सहज म्हणाला, ‘ ये सामने का पहाडी है ना, ये पार करनेका, उसके बादऔर दो पहाडी आएगा…वो भी चढके उतरने का, उसके बाद एक पहाड चढने का…बस…दिरांग आ जायेगा | ‘  हा भयंकर पत्ता ऐकल्यावर काकांनी विचारले..’आगे का रस्ता भी ऐसा ही है?’ तेव्हा अगदी उत्साहाने कोलीदा (आमचा driver) वदले…’नही, नही…इससेभी खराब है!’ रात्री पाठीच्या कण्याची काय हालत होणार आहे याचा अंदाज बांधत सगळे गप्प झाले!
 
या सर्व रस्त्यावर आपल्याला एरवी दिसतात तसे धाबे वगैरे काहीही नव्हते. गावेही फारशी लागत नव्हती. आर्मीचे कॅम्प्स मात्र बर्‍याच ठिकाणी होते. वाटेत न्याकमडाँग वॉर मेमोरिअल बघायला थांबलो. त्या वॉर मेमोरियलच्या बाहेरचा बोर्ड वाचून डोळ्यात पाणी आले.
 
 Image
 
आम्ही प्रवास करत असलेला अरुणाचल प्रदेश मधील सगळा भाग १९६२ च्या भारत-चीन युद्धात चीनच्या ताब्यात गेला होता. चीनची बॉर्डर जवळ असल्याने, आणि अतिसंवेदनाशील भाग असल्याने त्या भागांमध्ये फोटो काढण्याची परवानगी नव्हती
 
सुर्यास्त लवकर झाला, त्यानंतरचा प्रवास काळोखात असल्याने, कंटाळवाणा वाटायला लागला. कोलीदा मजेत गाडी चालवत होता. मी आणि चिनू काहीतरी बोलत होतो. मग हळूहळू आशाताई आणि गोंधळेकर काकाही त्यात सामिल झाले. पुढचा एक- दीड तास मस्त गप्पा रंगल्या. बोलण्याच्या नादात दिरांग कधी आले ते कळलेच नाही. संध्याकाळचे ७ वाजले होते. हॉटेलमध्ये पोहोचलो तेव्हा पाठीचे पार भरीत झाले होते.हॉटेलची रूम एकदम मस्त होती. खूप मोठ्ठा राउंड बेड, भरपूर उश्या, उबदार क्वील्ट्स.सामान रूममध्ये टाकून जेवणासाठी बाहेर आलो.हॉटेलचे आवार सोडले तर बाकी सर्व मिट्ट काळोख होता. पण वाहत्या पाण्याचा खळाळता आवाज येत होता, त्यावरून नदी जवळच आहे एव्हढे समजत होते.रात्र जशी वाढत होती, तशी थंडीदेखील वाढत होती. जेवणाची व्यवस्था बाहेरच्या अंगणात केली होती. गरम गरम सूप आणि इतर स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेऊन रूममध्ये गेलो. हीटर लावून क्विल्टमध्ये शिरलो. सकाळी खूप लवकर जाग आली. वेटर गरमागरम चहा घेऊन आला. चहाचा tray घेण्यासाठी दरवाजा उघडला आणि समोर हे दृष्य दिसले.
 
 Image
 
चिनूला हलवून जागे केले. म्हटलं, उठ लवकर, बाहेर बघ डोंगर किती मस्त दिसतोय. तो बिचारा उठला…एव्हढ्या थंडीत कशाला इतक्या लवकर उठवते ही आई!डोंगर काय पळून जाणार आहे का थोड्या वेळाने उठलो तर…असे पुटपुटत, डोळे चोळत बाहेर बघितले आणि झटकन तयार होऊन कॅमेरा घेऊन बाहेर पळाला.
 
हॉटेलच्या अंगणात खूप छान ऊन पडले होते. सगळे जण त्या ऊन्हात ऊबेला बसले. मग हॉटेलच्या व्यवस्थापकाने न्याहारीची व्यवस्था तिथे अंगणातच केली.त्यावेळी चिन्मयचा कॅमेरा चुकून माझ्या हातात आला…आणि मी लगेच त्याचाच फोटो काढला.
 
आजचा पूर्ण दिवस प्रवासाचा होता. दिरांग ते तवांग व्हाया सेलापास! आम्हाला सेलापास चे खूप आकर्षण होते. वाटेत एक गाव लागले. त्या गावात सगळ्या घरांच्या सज्जात मक्याची कणसे साठवणीला ठेवली होती.
 
वाटेत एक सुंदर नदी लागली. त्यावर एक मस्त ब्रिज! अगदी पोस्टर सारखे दिसत होते. तिथे थांबल्याशिवाय पुढे जाणेच शक्य नव्हते. खाली उतरून नदीकिनारी गेलो. नदीच्या पाण्यात हात घातला तर अंगातून शिरशिरी गेली… पाणी इतके थंड होते. माझ्याकडे टँगची भरपूर पाकीटे होती. मग नदीचे पाणी भरून घेऊन मस्त सरबत बनवले. आणि सगळ्यांनी प्यायले.
Image
चिन्मय एक ओढा पार करून फोटो काढायला पुढे गेला. मीही मग त्याच्या मागून गेले. ह्या आया ना, सुखाने काही करू देत नाहीत मुलांना! …काय गरज होती त्याच्या मागून जायची?  ओढा पार करताना माझा अंदाज चुकला आणि माझा एक पाय त्या थंडगार पाण्यात घोट्यापर्यंत बुडला. माझा बूट, आतले वूलन सॉक्स, आणि जीन्स्…त्या थंडगार पाण्यात पार भिजले! आधीच हवा एकदम चिल्ड होती…त्यात हे नसती आफत ओढवून घेतली! शांतपणे चिन्मयचे काळजीयुक्त फायरींग ऐकून घेतले. कारण त्यानंतर आम्ही सेलापासला जाणार होतो जिथे सहसा टेम्परचर सब झिरो असते आणि वेगाने वारे वाहत असतात! अशा भिजलेल्या अवस्थेत तिथे जाणे म्हणजे इन्फेक्शनला आमंत्रण देण्यासारखे होते!
 
मग गाडीत चिन्मयने तो भिजलेला बूट वर्तमानपत्रात गुंडाळून दाबून त्यातले पाणी पिळून काढले!सॉक्स बॉनेट्वर ठेवला…काय काय उद्योग केले! आमच्या सामानात एक्ट्रा सॉक्स होते, पण सगळ्या बॅगा गाडीच्या कॅरीयरवर ठेवल्या होत्या आणि पावसाने भिजू नयेत म्हणून वरून प्लास्टिकच्या मोठ्या कापडाचे आवरण घातले होते. त्यामुळे ते काढणे फार त्रासदायक होते! मग काय.. एका पायाला प्लास्टर सारखी शाल गुंडाळून गपचूप बसले गाडीत! जबरदस्त थंडी वाजायला लागली!
 
आताचा रस्ता जास्त वळणांचा आणि चढावाचा होता…त्यात पाऊस सुरू झाला…पुन्हा एकदा कोलीदाच्या driving skill ला दाद देत जमेल तसा निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत होतो. मनात विचार आला,  कुवेती लोक सरळ गुळगुळीत रस्त्यावरून गाडी चालवताना निष्काळजी driving मुळे इतके अपघातकरतात! जर अश्या रस्त्यांवरून गाडी घेऊन जायची असेल तर, सेलापास पर्यंत कितीजणं पोहोचतील, कुणास ठाऊक!
 

आजची संध्याकाळ

कितीतरी दिवसांनी या संध्याकाळच्या वेळी निवांत बसले आहे. काहीही न करता! गेल्या ६ महिन्यांत ज्या वेगाने घटना घडत गेल्या त्याचा नीट विचार करायला वेळच मिळाला नव्हता.

नोव्हेंबर २०१२ ते जानेवारी २०१३…खूप वाईट गेले. वैर्‍यावर देखील वेळ येऊ नये अशी आली. आईचे आजारपण आणि तिचे अचानक जाणे…सगळे काही अतर्क्य! अजूनही विश्वास बसत नाही की आई आता आपल्यात नाही.आईचे स्थान माझ्या आयुष्यात काय होते, हे फक्त मलाच ठाऊक आहे. ती नसण्याने किती एकटी झाले मी.

कोणी उरलं नाही. आता काही नाती आहेत, पण ती फक्त कर्तव्यापुरती. त्यात प्रेमाचा ओलावा नाही, मायेचा स्पर्श नाही. मला काय आवडते, काय नाही, याची पक्की ओळख केवळ तिलाच! मी न बोलताही माझ्या मनातले ओळखण्याची शक्ती केवळ तिच्यातच!

कधी कधी वाटते आपणच का? आपल्यावरच का असे प्रसंग यावेत? कितीतरी माणसं कसं मजेत आयुष्य जगत असतात. अगदी आखीव रेखीव. पुढच्या वीस – तीस वर्षांचे प्लॅन बनवतात आणि ते तसेच पार पडतात ही! आपण एखादी लहानशी गोष्ट करायची ठरवली, तरी नियती क्रूरपणे ऊधळून देते. का असं?

हे एकटेपणच आता आयुष्यभर सोबतीला. एकला चालो रे…या शब्दांचा आदर्श ठेऊनच  उरलेली वाटचाल करायची. सगळी नाती तपासून बघायची, त्यातली आपली सीमारेषा आखून घ्यायची. संदीप खरेची कविता आठवली, ‘एव्हढेच ना, एकटेच जगु!’ कुणावर खूप विसंबून रहायचं नाही. कुणावाचून काही अडवून घ्यायचं नाही. आपलं गाणं आपण गायचं! आपलं आयुष्य आपण जगायचं. काल पहिल्यांदा नाटकाला एकटीच गेले. आज कुठेही कामासाठी बाहेर जायचं नाकारून, संध्याकाळ आईला आठवत, तिच्या माझ्या चाललेल्या गप्पा आठवत…नुसतीच बसून होते.