आजची संध्याकाळ

कितीतरी दिवसांनी या संध्याकाळच्या वेळी निवांत बसले आहे. काहीही न करता! गेल्या ६ महिन्यांत ज्या वेगाने घटना घडत गेल्या त्याचा नीट विचार करायला वेळच मिळाला नव्हता.

नोव्हेंबर २०१२ ते जानेवारी २०१३…खूप वाईट गेले. वैर्‍यावर देखील वेळ येऊ नये अशी आली. आईचे आजारपण आणि तिचे अचानक जाणे…सगळे काही अतर्क्य! अजूनही विश्वास बसत नाही की आई आता आपल्यात नाही.आईचे स्थान माझ्या आयुष्यात काय होते, हे फक्त मलाच ठाऊक आहे. ती नसण्याने किती एकटी झाले मी.

कोणी उरलं नाही. आता काही नाती आहेत, पण ती फक्त कर्तव्यापुरती. त्यात प्रेमाचा ओलावा नाही, मायेचा स्पर्श नाही. मला काय आवडते, काय नाही, याची पक्की ओळख केवळ तिलाच! मी न बोलताही माझ्या मनातले ओळखण्याची शक्ती केवळ तिच्यातच!

कधी कधी वाटते आपणच का? आपल्यावरच का असे प्रसंग यावेत? कितीतरी माणसं कसं मजेत आयुष्य जगत असतात. अगदी आखीव रेखीव. पुढच्या वीस – तीस वर्षांचे प्लॅन बनवतात आणि ते तसेच पार पडतात ही! आपण एखादी लहानशी गोष्ट करायची ठरवली, तरी नियती क्रूरपणे ऊधळून देते. का असं?

हे एकटेपणच आता आयुष्यभर सोबतीला. एकला चालो रे…या शब्दांचा आदर्श ठेऊनच  उरलेली वाटचाल करायची. सगळी नाती तपासून बघायची, त्यातली आपली सीमारेषा आखून घ्यायची. संदीप खरेची कविता आठवली, ‘एव्हढेच ना, एकटेच जगु!’ कुणावर खूप विसंबून रहायचं नाही. कुणावाचून काही अडवून घ्यायचं नाही. आपलं गाणं आपण गायचं! आपलं आयुष्य आपण जगायचं. काल पहिल्यांदा नाटकाला एकटीच गेले. आज कुठेही कामासाठी बाहेर जायचं नाकारून, संध्याकाळ आईला आठवत, तिच्या माझ्या चाललेल्या गप्पा आठवत…नुसतीच बसून होते.